आकुम्र्डी परिसरात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याची घटना ताजी असतानाच थेरगावात शुक्रवारी (१० जून) टोळक्याने धुमाकूळ घातला. थेरगावात दोन गटांतील वादातून पंचवीस मोटारींच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले आहेत.
थेरगावात दोन गटांमध्ये वर्चस्वाचा वाद आहे. या कारणावरून शुक्रवारी मध्यरात्री कैलासनगर येथे टोळक्याने दगड आणि सिमेंटच्या विटा मोटारींच्या काचांवर टाकून तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाटीलनगर भागातील वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. दोन्ही गटांतील तरुणांकडे काठय़ा आणि तीक्ष्ण शस्त्रे होती. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले. रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत टोळके पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रक रणी शारदा वसंत खलसे आणि पवन बाबू सुतार यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकुडी-प्राधिकरण परिसरात १ जून रोजी दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या वीस ते पंचवीस मोटारींच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी थेरगाव येथे धुमाकूळ घालून वाहनांच्या काचा फोडल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Story img Loader