‘आयटी हब’ म्हणून लौकिक असलेल्या आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे गुदमरू लागलेल्या हिंजवडीला आता मोकळा श्वास हवा आहे. हजारो-लाखो लोकांची दररोज होणारी दैना दूर करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. शासकीय पातळीवर केवळ बैठका घेऊन कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला पाहिजे आणि एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना केली पाहिजे, अशी आग्रही मागणी या भागातील रहिवासी करत आहेत.
सकाळी हिंजवडीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि सायंकाळी हिंजवडीकडून पुणे, मुंबई आणि पिंपरी-चिंचवडच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात, ही परिस्थिती आठ वर्षांहून अधिक काळ आहे. मात्र, त्यावर उपाययोजना होत नसल्याने सध्याची परिस्थिती भीषण आहे. एखादी दुर्घटना झाल्यानंतर काही करण्यापेक्षा आताच ठोस कृती करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. हिंजवडी, माणच्या आयटी परिसरात सध्या तीन फेज आहेत. चवथा टप्पा प्रस्तावित आहे. तो सुरू झाल्यानंतर काय अवस्था होईल, याचा आतापासूनच विचार व्हायला हवा. भविष्यात काय वाढून ठेवले असेल, याची कोणाला कल्पना नाही. या आयटी परिसरात पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या तब्बल ३५ मजली इमारतीचे काम सुरू आहे. दुसरा बांधकाम व्यावसायिक जवळपास १५० एकरापेक्षा अधिक जागेत मोठे टाऊनशिप उभारतो आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नागरिक येथे राहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे वर्दळ वाढेल, त्याचा ताण वाहतुकीवर पडणारच आहे. आर्थिकदृष्टय़ा कितीही संपन्न असली तरी हिंजवडी ग्रामपंचायतीला कारभार पेलवत नाही, असे दिसते. अशा परिस्थितीत शासनपातळीवर आवश्यक उपाययोजना व्हायला हव्यात. शक्य तेथील पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावली पाहिजे, असा नागरिकांचा आग्रह आहे. हिंजवडी-म्हाळुंगे-बालेवाडीचा रस्ता व पूल झाला पाहिजे. अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण झाले पाहिजे. यापूर्वी ज्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले, त्यावरील अतिक्रमणे, पथारीवाले आणि अशा रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांचा बंदोबस्त झाला पाहिजे. भूमकर चौक ते हिंजवडी या मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहनस्वार लेन सोडून जातात, त्यामुळे होणाऱ्या कोंडीचा अनेकांना नाहक मनस्ताप होतो. तेथे दुभाजक बसवणे किंवा योग्य पर्यायाचा विचार झाला पाहिजे. येथील समस्यांविषयी नुसतीच चर्चा होते. लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात, अधिकारी बैठका घेतात. मात्र ठोस कार्यवाही होत नाही.

पाहुणे टाळाटाळ करतात !
हिंजवडी आणि लगतच्या परिसरात होणाऱ्या दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे आमच्याकडे पाहुणे मंडळी येण्यास नाखुश असतात, असे या भागातील नागरिक सांगतात. बाहेरून येणाऱ्यांना रस्ते समजत नाहीत. वाहतूक पोलीस वेगवेगळे प्रयोग करत असतात, त्याची माहिती नसते. लग्नसराईत रस्त्यावर उभ्या-आडव्या पध्दतीने मोटारी लावल्या जातात, त्यातून परिस्थिती आणखी बिकट होते. रविवार वगळता इतर दिवशी सकाळी आणि सायंकाळी कोणतीही कामे करायची सोय राहिलेली नाही. विद्यार्थी, कामगार, महिला सर्वानाच दररोजचा त्रास असल्याचे ते सांगतात.

वाहतूक पोलिसांची ‘चिरीमिरी’
सकाळी वाहतूक सुरू होते, तेव्हा पोलीस जागेवर नसतात. त्याचा परिणाम म्हणजे भल्या सकाळीच वाहतूक कोंडीला सुरुवात होते आणि नंतर नाकी नऊ येतात. नेमून दिलेली जागा सोडून वाहतूक पोलीस ‘चिरीमिरी’साठी ग्राहक शोधत असतात, त्यामुळे वाहनस्वारांचे फावते. मुळात अपुरे पोलीस असताना निमूटपणे काम करण्याऐवजी चहापाणी आणि हप्तेगिरीच्या नादात वाहतुकीचा बोजवारा उडण्यास हातभारच लागतो.