उंची कमी असलेल्या रेल्वे फलाटांची उंची वाढविण्याचे काम पुणे- लोणावळा दरम्यान सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगर, दापोडी, बेगडेवाडी व देहूरोड या स्थानकावर सध्या काम सुरू असून, फलाटांची उंची कमी असल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या कामामुळे दूर होऊ शकणार आहेत.
फलाटांची उंची कमी असल्यामुळे प्रामुख्याने लोकल गाडय़ांमध्ये चढण्यास विविध समस्या निर्माण होत आहेत. गाडीचा दरवाजा व फलाट यामध्ये मोठे अंतर असल्याने गाडीत चढताना प्रवाशांना अनेकदा अपघात होतात. या घटनांमध्ये काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे फलाटांची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मुंबईत अशा सर्व फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याबरोबरच पुणे- लोणावळा दरम्यान कमी उंची असलेल्या फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या चार स्थानकांतील फलाटांची उंची वाढविण्यात येत आहे. त्यातील बेगडेवाडी येथील फलाटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. उंची वाढविताना फलाटाची दुरुस्तीही होणार आहे. या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. फलाटाची उंची वाढविण्याचे काम सुरू असलेल्या स्थानकात प्रवाशांनी गाडीत चढताना काळजी घ्यावी व या कामासाठी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.