स्वाइन फ्लूवरील ‘टॅमी फ्लू’ गोळ्या कुठे विकत मिळतील याबद्दल पुणेकरांना सतावणारी चिंता त्यांनी या गोळ्या मिळवण्यासाठीच्या हेल्पलाईनवर भरभरून केलेल्या दूरध्वनींमधून उघड झाली आहे. ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने गेल्या सात दिवसांपासून टॅमी फ्लूच्या गोळ्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुरू केली असून त्यावर तब्बल ४ हजार पुणेकरांनी फोन केले आहेत.
ही हेल्पलाईन सेवा नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध आहे. विशेष म्हणजे केवळ शहरातीलच नव्हे, तर तालुक्यातील टॅमी फ्लू विक्रेत्यांची माहितीही या दूरध्वनी क्रमांकावर मिळते आहे. केवळ टॅमी फ्लूच नव्हे तर स्वाइन फ्लूची लक्षणे कोणती, ती दिसल्यावर आधी काय करु असे प्राथमिक प्रश्न विचारणारेही दूरध्वनी या हेल्पलाईनवर आल्याची माहिती संघटनेचे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे खजिनदार अनिल बेलकर यांनी या हेल्पलाईनची संकल्पना मांडली होती.  
चंगेडिया म्हणाले, ‘‘औषधविक्रेत्यांकडे टॅमी फ्लूचा तुटवडा नाही. कोणत्याही भागातून फोन आला तरी त्या भागात कोणाकडे टॅमी फ्लू मिळेल त्या दुकानाचा दूरध्वनी क्रमांक व पत्ता आम्ही सांगतो आहोत. गेल्या ७ दिवसांत मी एकटय़ानेच ७०० दूरध्वनी उचलले आहेत. अगदी रात्री १- २ वाजताही दूरध्वनी करुन नागरिक प्रश्न विचारत आहेत. आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांनाही अत्यावश्यक औषधे मिळवून देण्यास मदत करत आहोत. ‘शेडय़ूल एक्स’ची औषधे विकणाऱ्या दुकानांची यादी आम्ही सर्व औषधविक्रेत्यांना देत आहोत. त्यामुळे कोणत्याही औषधविक्रेत्याकडे गेल्यावर टॅमी फ्लूची विक्री करणाऱ्या दुकानांची माहिती मिळू शकेल. एक दूरध्वनी आम्हाला मुलुंडमधील रहिवाशाकडूनही आला होता.’’

‘टॅमी फ्लू’ विक्रेत्या दुकानांची माहिती देणारे हेल्पलाईन क्रमांक खालीलप्रमाणे-

दूरध्वनी क्रमांक- ७७२०९६६४६६, ७७२०८६६४६६
विजय चंगेडिया- ०९८२२०८९५८९
अनिल बेलकर- ९८२२४०४९६०
चेतन शहा- ९८६०१४१४१८

टॅमी फ्लू’ विषयी काही-

– स्वाईन फ्लूच्या उपचारांसाठीचे ‘ऑसेलटॅमीविर’ हे औषध ‘टॅमी फ्लू’ या ब्रँड नावाने ओळखले जाते. हे प्रतिबंधक औषध नव्हे.  
– हे ‘शेडय़ूल एक्स’मधील औषध असून नशा आणणारी काही औषधे शेडय़ूल एक्समध्ये मोडतात. त्यामुळे ही औषधे विकण्यासाठी औषधविक्रेत्याला अन्न व औषध प्रशासनाचा विशेष परवाना घ्यावा लागतो. त्यामुळेच प्रत्येक औषध दुकानांमध्ये ही औषधे उपलब्ध होत नाहीत. असे असले तरी औषधविक्रेत्यांकडे या औषधांचा तुटवडा नाही.
– टॅमी फ्लूच्या गोळ्या स्वत:च्या मनाने घेता येत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागते. तसेच एकदा टॅमी फ्लू घेतले की त्याचा डॉक्टरांनी सांगितलेला डोस पूर्ण करावा लागतो नाहीतर औषधास प्रतिरोध निर्माण होण्याची शक्यता असते.

Story img Loader