कडक, शिस्तप्रिय आयुक्त म्हणून लौकिक असलेल्या पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा कायम धीरगंभीर चेहरा, हा देखील चर्चेचा विषय आहे. आयुक्त कधी हसत नाहीत, विनोद तर त्याहून करत नाहीत, अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यात अनेकांनी अनुभवली. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत ‘बदली’च्या विषयावर सूचक टिप्पणी करत ते दिलखुलास हसले. त्यांच्या विनोदाला दाद देत उपस्थित नगरसेवक व अधिकारी सर्वच त्यात सहभागी झाले.
पिंपरीतील नगरसेविका सुनीता वाघेरे यांनी शिक्षण मंडळाविषयी तक्रारीचा मुद्दा मांडला. आयुक्त साहेब, मी तुम्हाला शिक्षण मंडळाविषयीचे निवेदन दिले होते. त्यावर तुम्ही शेरा मारून ते मंडळाकडे पाठवले होते. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही, असे त्या म्हणाल्या. तेव्हा आयुक्त म्हणाले,‘‘ तुम्ही दिलेले निवेदन प्रशासन अधिकारी डॉ. अशोक भोसले यांच्याकडे पाठवले होते. मात्र, त्यांची बदली झाली आहे. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त तो विषय पाहत होते, त्यांचीही बदली झाली आहे. आता मीच राहिलो आहे. माझी कधी बदली होईल, ते सांगता येत नाही. त्याआधी तुमचे काम केले पाहिजे,’’ अशी टिप्पणी आयुक्तांनी केली, तेव्हा सर्वानीच हसून दाद दिली. यापूर्वी, पालिका सभेत महेश लांडगे म्हणाले होते,‘‘आयुक्त साहेब, तुम्ही आमची कामे करू नका. पण असे रागावल्यासारखे पाहू नका, जरा तरी हसा.’’ तेव्हाही आयुक्तांनी दिलखुलास दाद दिली नव्हती. नगरसेवकांशी चांगल्या प्रकारे ओळखी झाल्यानंतर ते आता जरा खुलले आहेत. त्यामुळेच, स्वत:च्या बदलीवर टिप्पणी करून त्यांनी कधी नव्हे ती विनोदनिर्मिती केल्याचे सांगण्यात येते.
माझी कधी बदली होईल सांगता येत नाही- डॉ. श्रीकर परदेशी
डॉ. श्रीकर परदेशी यांचा कायम धीरगंभीर चेहरा, हा देखील चर्चेचा विषय आहे. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत ‘बदली’च्या विषयावर सूचक टिप्पणी करत ते दिलखुलास हसले
आणखी वाचा
First published on: 02-08-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I myself dont know about my transfer dr shrikar pardeshi