वीजचोरीच्या घटनांमध्येही वाढ; दाट लोकवस्तीत अपघातांचा धोका

महावितरण कंपनीकडून विजेचे जाळे पसरविताना कारभार मात्र नियोजनशून्य पद्धतीनेच पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे. वीजचोरीसाठी दिवसाढवळ्या धोकादायक पद्धतीने टाकले जात असलेले आकडे आणि उच्चदाब वीज वाहिनीखाली राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा बांधकामे याकडे महावितरण कंपनीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. शिवाय बहुतेक सर्व विद्युत संचांना झाडाझुडपांनी वेढले असून भर वस्तीतील उघडय़ा विद्युत पेटय़ांमुळे दाट लोकवस्तीत अपघातांचाही धोका वाढला आहे.

पिंपरी-चिंचवडमधून महावितरण कंपनीला मुंबईनंतरचा सर्वात जास्त महसूल मिळतो. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी विजेचे जाळे निर्माण करणाऱ्या महावितरण कंपनीकडून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. शहरातील वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे अनेक वेळा झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याची उदाहरणे आहेत. पिंपरी तसेच चिंचवड स्टेशन येथे काही महिन्यांपूर्वी विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन एकाचा जीव गेला होता.

वीजजोड देण्यासाठी लावलेल्या विद्युत पेटय़ांची काळजीही कंपनीकडून घेतली जात नाही. भर वस्तीमध्ये असलेल्या या विद्युत पेटय़ांमुळे जीवितहानीचे प्रकार घडू शकतात. रोहित्र तसेच विद्युत संचाच्या संरक्षक जाळ्यांना झाडाझुडपांनी वेढल्याचे चित्र शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ओल्या झाडांमधून लोखंडी खांबामध्ये किंवा जाळ्यांमध्ये वीज उतरून धोका निर्माण होण्याची शक्यता असताना ही झाडे किंवा वेली वेळेवर काढल्या जात नाहीत.

शहराच्या अनेक भागातून विद्युत पारेषण कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिन्या गेल्या आहेत. शहराचा विस्तार वाढत असताना या वाहिन्यांच्या खाली राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. चिखली भागात उच्चदाब वाहिनीच्या तारा कमी उंचीवर होत्या म्हणून स्थानिक नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर तेथील खांबाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. या वीज वाहिन्यांच्या खाली राहणाऱ्या काही रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. चिखलीच्या मोरेवस्ती भागात नारळाचे झाड तोडण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला वर्षभरापूर्वी आपला जीव गमवावा लागला होता. सध्या या वाहिनीच्या तारा उंचावर बसविण्याचे काम सुरू असताना पंधरा दिवसांपूर्वी तार तुटून पाचजण जखमी झाले होते. त्यातील एकजण गंभीर जखमी होता. सहा महिन्यांपूर्वी नेवाळे वस्ती येथे जांभळाच्या झाडावर चढलेल्या एका तरुणाला या उच्चदाब वाहिनीचा धक्का लागून जीव गमवावा लागला होता.

  • यमुनानगर ओटा स्किममध्ये वीजचोरी
  • बहुतांश विद्युत संचांना झुडपे, वेलींचा विळखा
  • बहुतेक विद्युत पेटय़ांची झाकणे निखळलेली

 

 

Story img Loader