शहरातील बडय़ा वीजचोरांबरोबरच आता घरगुती वीजचोरांकडेही महावितरण कंपनीने मोर्चा वळविला असून, त्या माध्यमातून उल्लेखनीय काम करण्यात येत आहे. पिंपरी विभागामध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एकाच दिवसाच्या कारवाईमध्ये अवैध वीजजोड घेतलेले सुमारे पावणेसातशे प्रकार आढळून आले. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येत असली, तरी वीजचोरी करणाऱ्यांनी हे अवैध वीजजोड केले नसून, ते कुणाकडून तरी करवून घेतले असल्याचे स्पष्ट आहे. वीजयंत्रणेची इत्थंभूत माहिती असणारी ही मंडळी असण्याची शक्यता असून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होत नसल्याने ही मंडळी अद्यापही मोकाटच आहे.
महावितरण कंपनीच्या पुणे परिमंडलाचा कार्यभार मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनाखाली मोठमोठय़ा वीजचोरांना पकडण्यात आले आहे. पुणे विभागात यापूर्वी कधीच होऊ न शकलेली कारवाई मुंडे यांच्या कारकीर्दीत झाली आहे. मोठे कारखानदार, व्यावसायिक, हॉटेल चालक आदींकडून होणारी लाखो रुपयांची वीजचोरी अभ्यासपूर्णपणे उघडकीस आणण्यात आली आहे. त्यामुळे वीजचोऱ्या पकडण्याचा एक विक्रमच झाला आहे.
वीजचोरांना पकडण्याची ही मोहीम अद्यापही सुरूच असून, ती यापुढेही याच जोमाने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बडय़ा वीजचोरांबरोबरच घरगुती वापराच्या विजेच्या चोरींवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसांपूर्वी विविध ठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे तीस लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याच दरम्यान अवैध वीजवापराबाबतही कारवाई करण्यात आली. त्यात भाटनगर, आंबेडकरनगर, लिंक रस्ता, भीमनगर, पिंपरी भाजी मंडई, सुभाषनगर, आंबेडकर कॉलनी, निराधारनगर आदी भागामध्ये तब्बल पावणेसातशे प्रकरणात थेट अवैध पद्धतीने वीज घेण्यात येत असल्याचे दिसून आले. पिंपरीतील हे भाग संवेदनशील समजले जातात. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
महावितरणने केलेली ही कारवाई विभागीय पातळीवरून करण्यात आली. त्यामुळे संबंधित वीजचोरांवर थेट छापे टाकण्यात आले. या भागात विजेच्या यंत्रणेशी रोजचा संबंध असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भागात अवैध पद्धतीने विजेचा वापर होत असल्याचे माहीतच नव्हते का, असा प्रश्नही सध्या उपस्थित करण्यात येत आहे. या भागामध्ये थेट कारवाईत मागेही असे प्रकार उघडकीस आले आहेत. बडय़ा वीजचोरांना वीजचोरीसाठी मदत करणारे व यंत्रणेची माहिती असणाऱ्यांपर्यंत पोलीसही अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. विजेच्या यंत्रणेत घोळ करून घेण्यासाठी या यंत्रणेची माहिती असणाऱ्यांचाच वापर केला जातो. घरगुती वीजचोऱ्यांच्या प्रकरणातही वेळोवेळी ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे अवैध वीजजोड प्रकरणातही असे वीजजोड करून देणारे शोधून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. त्यातून शहराच्या विविध भागात आणखी अवैध वीजजोड हाती लागण्याची शक्यता आहे.
अवैध वीजजोड करून देतंय कोण?
वीजचोरी करणाऱ्यांनी हे अवैध वीजजोड केले नसून, ते कुणाकडून तरी करवून घेतले असल्याचे स्पष्ट आहे. वीजयंत्रणेची इत्थंभूत माहिती असणारी...
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 05-02-2016 at 03:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal electricity connections theft