कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे निलख येथील उड्डाणपुलाचे शुक्रवारी घाईघाईने भूमिपूजन केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी ते बालेवाडीत येणार होते. ‘जाता-जाता’ त्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेत ‘लग्नात मुंज’ उरकून घेतल्याचे बोलले जाते.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सांगवी-किवळे बीआरटी मार्गाचे काम सुरू आहे. या दरम्यान िपपळे निलख येथील साईचौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्याचे प्राधिकरणाचे बरेच दिवसांपासून नियोजन आहे. तथापि, तो लांबणीवर पडत होता. आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने तो कार्यक्रम घेण्याचे फर्मान सुटले होते. त्यानुसार, गुरुवारी रात्री निश्चित झाले आणि शुक्रवारी सकाळी साडेनऊला भूमिपूजन ठरले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बालेवाडीतील शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी येणार होते. त्याला जोडून हा कार्यक्रम घेण्यात आला. वर्तमानपत्रातील जाहिरातींमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो होता. मात्र, ते कार्यक्रमाला नव्हते. भर पावसात घाईने अजितदादांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी माजी आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यानिमित्त जाहीर सभेचे नियोजन होते. तथापि, अत्यल्प वेळ व पावासाचा व्यत्यय यामुळे सभा झाली नाही व अजितदादांचे भाषणही होऊ शकले नाही. राष्ट्रवादीशी चार हात लांब राहणाऱ्या लक्ष्मण जगतापांची याही कार्यक्रमात उपस्थिती होती. अजितदादा व जगताप एकाच मोटारीतून पुढील कार्यक्रमासाठी गेले.
इच्छुकांचा गराडा
पिंपरीच्या महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल होणार आहेत. अजितदादांची ‘कृपादृष्टी’ व्हावी, या हेतूने दोन्ही पदांसाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी त्यांना गराडा घातला होता. तथापि, याविषयी त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. दुपारनंतर नावे कळवणार असल्याचा निरोप त्यांनी दिला.
राजकीय श्रेयासाठी औंध-रावेत उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची घाई
कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे निलख येथील उड्डाणपुलाचे शुक्रवारी घाईघाईने भूमिपूजन केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी ते बालेवाडीत येणार होते.
First published on: 06-09-2014 at 02:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of aundh ravet bridge for political credit