पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आकुर्डीत बोलताना केली. वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत बारणेंनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आकुर्डीत प्रमोद कुटे यांच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा, तसेच रूग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते, तेव्हा ते बोलत होते. नगरसेविका चारूशीला कुटे, नीलेश बारणे, मधुकर बाबर, उत्तम कुटे, प्रभाकर कुटे, संतोष भोसले आदी उपस्थित होते. बारणे म्हणाले,की घरफोडी, जबरी चोऱ्या, रोकड, दागिने लुटण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजात राजकीय दलाल वाढले असून पैशाच्या आमिषाला बळी पडून मतदारही मतांची सौदेबाजी करण्यास तयार होतात. त्यामुळे भविष्यात लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होईल. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. प्रमोद कुटे यांनी आभार मानले.

Story img Loader