भोसरीतून यंदा शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास ‘मातोश्री’ ला होता. मात्र, पक्षात बंडाळी झाली आणि त्यांचा पराभव झाला. गेल्या वेळी बंडखोरी व पक्षविरोधी कारवाया झाल्या, भाजप नेत्यांनाही हातभार लावल्याने उबाळे थोडक्यात पराभूत झाल्या. सलग दोनदा पक्षांतर्गत दुफळीमुळे उबाळे यांना आमदारकीची हुलकावणी मिळाली आणि भोसरी मतदारसंघ शिवसेनेच्या हातात येता-येता राहिला.
गेल्यावेळी अनेकांची स्पर्धा असताना उबाळेंनी उमेदवारी मिळवली, तेव्हा माजी शहरप्रमुखाने बंडखोरी केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले. त्याचवेळी, भाजपच्या एका गटाने उबाळे यांच्या विरोधात व आमदार विलास लांडे यांच्या फायद्याचे काम केले. त्याचा परिणाम लांडे यांच्याकडून उबाळे अवघ्या १२०० मतांनी पराभूत झाल्या. हाता-तोंडाशी आलेला घास गेला. तरी त्या सक्रीय राहिल्या. यंदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुन्हा उमेदवारीसाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. शहरप्रमुख विजय फुगे यांच्यासह अपक्ष निवडून आलेले आमदार महेश लांडगे देखील शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक होते. नंतर, लांडगे व फुगे यांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले. बऱ्याच नाटय़मय घडामोडीनंतर उबाळेंनी उमेदवारी खेचून आणली, त्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटला. अनेक पदाधिकाऱ्यांनी  उघडपणे विरोध केला व ते लांडगे यांच्या कळपात सहभागी झाले. त्याचा उबाळे यांना फटका बसला. चुरशीच्या निवडणुकीत लांडगे यांना ६० हजार मते मिळाली. तर, उबाळे ४५ हजार मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. गेल्यावेळी महायुती असताना सेनेच्या विरोधात गेलेले एकनाथ पवार भाजपचे उमेदवार होते. त्यांनी घेतलेली ४४ हजार मते उबाळेंना मारक ठरली. सर्वात महत्वाचे म्हणजे संधी व वातावरण असतानाही शिवसेनेतील बंडाळीमुळे उबाळे यांना आमदारकीची दुसऱ्यांदा हुलकावणी मिळाली.

Story img Loader