पिंपरी पालिकेच्या वतीने १३० कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या कासारवाडी-नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाला भारतरत्न जेआरडी टाटा यांचे नाव देण्यात आले असून नामकरण समारंभासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. १५ फेब्रुवारीला उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा होणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
औद्योगिक नगरी म्हणून विकसित झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या उभारणीत आधीची टेल्को आणि आताच्या टाटा मोटर्स कंपनीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याची दखल घेऊनच कासारवाडीतील दुमजली उड्डाणपुलास जेआरडी टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाचे उद्घाटन व नामकरण समारंभासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी १५ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. या समारंभास टाटा परिवारातील मान्यवर उपस्थित रहावेत, यादृष्टीने पिंपरी पालिकेचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांना खास आमंत्रित करण्यात येणार आहे, असे पवार यांनी जाहीर केले.

Story img Loader