पिंपरी-चिंचवडमधील प्रभागात रंगतदार घडामोंडीना वेग; माजी उपमहापौर केंद्रस्थानी
प्रभाग क्रमांक १९ चिंचवड-आनंदनगर-पिंपरी कॅम्प-भाटनगर
पिंपरी व चिंचवडचा काही भाग एकत्र करून तयार झालेला हा प्रभाग ‘विचित्र’ पद्धतीने पसरलेला आहे. झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ा अशा संमिश्र प्रभागात दारू, पैसा आणि दादागिरी हेच सूत्र राहणार आहे. माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या या पट्टय़ात काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले माजी उपमहापौर अमर मूलचंदाणी केंद्रस्थानी आहेत. निवडणुकांना अवकाश असला तरी प्रभागात सध्या सुरू असलेल्या घडामोडी मात्र रंगतदार अवस्थेत आहेत.
पिंपरी कॅम्पचा अर्धा भाग, भाटनगर, बौद्धनगर, आंबेडकर वसाहत, रमाबाईनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, उद्योगनगर, दळवीनगर झोपडपट्टी, कामदा तसेच देवधर सोसायटी, एसकेएफ कॉलनी, श्रीधरनगर, जीवननगर, सुदर्शननगर, गोलांडे इस्टेट, गावडेनगर, विजयनगर झोपडपट्टी असे नव्या प्रभागाचे क्षेत्र आहे. तुकडे-तुकडे एकत्र जोडल्याप्रमाणे प्रभागाची रचना असून या सर्व भागांचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. जवळपास आठ विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांचे क्षेत्र एकत्र झाल्याने या पट्टय़ातील आजी-माजी नगरसेवक समोरासमोर आले आहेत. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला व अनुसूचित असे आरक्षण आहे. मात्र, प्रत्येक गटात संभ्रमाचे वातावरण आहे. प्रभागाच्या एकूण क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के झोपडपट्टी परिसरातील मतदार आहे. सुशिक्षित वर्गाचे प्रमाणही लक्षणीय आहे. राष्ट्रवादी व भाजपमध्ये प्रामुख्याने वेगवान घडामोडी होत असून इतरत्र तूर्त शांतता आहे. पिंपरी कॅम्पचा हक्काचा भाग सोडून मूलचंदाणी यांनी या प्रभागात उडी घेतली. सुरुवातीला खंदे समर्थक राजू सावंत यांना पुढे करून त्यांनी स्वत:ची चाचपणी करून घेतली. आता सावंत यांना अनुसूचित गटातून व स्वत:साठी खुल्या गटातून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. मूलचंदाणी रिंगणात आल्यास प्रभागात बऱ्याच गोष्टी ओघाने येणार आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू गोलांडे भाजपच्या उंबरठय़ावर आहे. ठोस शब्द मिळत नसल्याने त्यांचा निर्णय प्रलंबित आहे. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे मूलचंदाणींशी असलेले सख्य गोलांडे यांच्या दृष्टीने अडचणीचे आहे. नगरसेवक झाल्यानंतर फारसे कोणाच्या संपर्कात नसलेले गुरुबक्ष पेहलानी पुन्हा दावेदार झाले आहेत. नगरसेवक सुजित पाटील, चेतन गावडे, हेमंत भोईर, शैलेश मोरे, माधव खोत अशी खुल्या गटात मोठी रांग आहे.
विद्यमान नगरसेवक शीतल शिंदे यांच्यापुढे स्वत: किंवा पत्नी असे दोन पर्याय आहेत. महिला गटात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेविका जयश्री गावडे पुन्हा भवितव्य आजमावत आहेत. ओबीसी महिला गटाचा पर्यायही त्यांच्याकडे आहे.
पाच वर्षांचा खंड पडलेले माजी नगरसेवक काळूराम पवार मनासारखे आरक्षण मिळाल्याने सर्वाच्या आधी कामाला लागले आहेत. प्रभागाची एकूण रचना पाहता व ठरावीक उमेदवारांची कार्यपद्धती पाहता या ठिकाणी दारू, पैसा आणि दादागिरी हेच सूत्र राहण्याची दाट शक्यता आहे.