हिंदी सिनेमांचे खेळ थांबवण्याची चित्रपट महामंडळाची व्यवस्थापकाला विनंती

किबे लक्ष्मी चित्रपटगृह (जुने प्रभात चित्रपटगृह) हे पुण्याचे सांस्कृतिकदृष्टय़ा वैभवाचे आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी ते माहेरघर असल्यासारखे आहे. असे हे चित्रपटगृह कायमस्वरुपी फक्त मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध राहावे व मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यास या चित्रपटगृहाने हातभार लावावा, अशी विनंती चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.

किबे लक्ष्मी चित्रपटगृह हे मराठी चित्रपटांचे माहेर असल्याने या ठिकाणी फक्त मराठी चित्रपट दाखविले जावेत. हे चित्रपटगृह मराठी चित्रपटांसाठी हक्काचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या पूर्वीच्या प्रभात आणि आताच्या किबे लक्ष्मी चित्रपटगृहात मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची परंपरा आहे. या चित्रपटगृहात हिंदी चित्रपटाचे दोन खेळ लावण्यात आले आहेत. बहुतांश बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये (मल्टिप्लेक्स) मराठी चित्रपटांना स्थान मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या चित्रपटगृहात मराठीच चित्रपट प्रदर्शित करावेत अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना दिले आहे.

किबे लक्ष्मीसारख्या हक्काच्या ठिकाणी मराठी ऐवजी हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्याबद्दल मराठी प्रेक्षकांकडून आणि मराठी  चित्रपट क्षेत्रातूनही नाराजीची भावना उमटली आहे. या पाश्र्वभूमीवर महामंडळाने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. किबे चित्रपटगृहाचे मालक, व्यवस्थापक सुरेश किबे यांनी हे निवेदन स्वीकारले. मराठी रसिक व निर्मात्यांच्या हृदयात या चित्रपटगृहाने स्थान निर्माण केले आहे. या ठिकाणी पूर्वी फक्त मराठी चित्रपट दाखवले जात होते. हे चित्रपटगृह मराठी निर्मात्यांसाठी माहेरघर असल्यासारखे आहे. आपले चित्रपटगृह कायमस्वरुपी फक्त मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध रहावे आणि मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यास  हातभार लावावा, अशी विनंती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली.

चर्चेचा विषय

प्रभात चित्रपटगृहात अनेक वर्षे सातत्याने आणि आवर्जून मराठी चित्रपटच दाखवले गेले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या  चित्रपटगृहाचे आणि पुणेकर प्रेक्षकांचे वर्षांनुवर्षांचे नाते आहे. अशा प्रभात चित्रपटगृहात हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

Story img Loader