नवीन वीजजोडणी त्याचप्रमाणे नवीन किंवा वाढीव वीजभार मंजुरीच्या कामामध्ये प्रशासकीय दिरंगाई होत असल्यास त्याबाबतची तक्रार आता ‘महावितरण’ च्या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. तक्रारींसाठी १८००२००३४३५ व १८००२३३३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहकांना तक्रार क्रमांक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वीजजोडणीच्या प्रक्रियेची सद्यस्थिती संबंधित ग्राहकांना कळविण्यात येते. ग्राहकाने नवीन वीजजोडणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यापुढे ‘महावितरण’ अंतर्गत होणारी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्वच वर्गातील नवीन वीजजोडणीसाठी http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर शहरी भागात सात व ग्रामीण भागामध्ये दहा दिवसांत संबंधित ग्राहकाशी संपर्क  साधला जातो. वीजजोडणीसाठी जागेची पाहणी व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येते.
एक खिडकी ग्राहक सुविधा केंद्रात वीजजोडणीबाबतच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. नवीन वीजजोडणी, वीजभार मंजुरी, नावात बदल आदींसाठी पद्मावती, रास्ता पेठ, नगर रस्ता, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्ता पेठ येथील ग्राहक सुविधा केंद्रात तसेच कोथरूड विभागातील ग्राहकांनी एसएनडीटी महाविद्यालयाजवळील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क साधावा. शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी चतुश्रुंगी मंदिरासमोरील ग्राहक सुविधा केंद्रात, तर िपपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन ‘महावितरण’ कडून करण्यात आले आहे.