पिंपरी पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रकल्पांपैकी निवडक प्रकल्पांना रोषणाई करण्याचा मानस आयुक्त राजीव जाधव यांनी व्यक्त केला आहे. सध्या पालिका मुख्यालय तसेच कासारवाडी-नाशिकफाटा उड्डाणपुलाला होणारी रोषणाई यापुढे अन्य प्रकल्पांसाठीही करण्यात येणार आहे, त्यासाठी आवश्यक तरतूदही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी महापालिका मुख्यालयाची नवीन इमारत आणखी सुशोभित झाली आहे. विशिष्ट कार्यक्रमानिमित्त मुख्यालयाला कधी-कधी रोषणाई केली जाते. जवळपास १५० कोटी रूपये खर्च करून नाशिकफाटा येथे उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाला आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. त्यातून मिळणाऱ्या चांगल्या प्रतिक्रियांची नोंद घेऊन पालिकेच्या मुख्य प्रकल्पांना रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक तरतूदही करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यापुढे रावेत येथील बास्केट ब्रिजसारख्या प्रकल्पांचा रोषणाईसाठी विचार करण्यात येणार आहे. सायंकाळी रोषणाई करण्यात येईल, रात्री अकरानंतर ती थांबवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, शहराच्या दृष्टीने आकर्षणाचा बिंदू असलेल्या भक्ती-शक्ती शिल्पसमूहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकोबांच्या शिल्पांची नव्याने रंगरंगोटी करण्यात येणार असून आजूबाजूचा उद्यान परिसरही सुशोभित करण्यात येणार आहे.

Story img Loader