वाचनसंस्कृतीची नवी ओळख प्राप्त करून देत महाबळेश्वरजवळील भिलार येथे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव साकारत असताना स्थानिक नागरिकांनी लोकसहभागाचा वाटा उचलला आहे. गावातील घरे आणि जननीमाता मंदिर परिसर अशा २५ ठिकाणी फुललेल्या बहारदार विश्वामध्ये मराठीजनांनी वाचनाचा आनंद लुटावा, हा उद्देश साध्य करण्यासाठी भिलारकरांनीही कंबर कसली आहे.

निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणारे भिलार हे गाव जगाच्या नकाशावर ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख घेऊन येत आहे. खुले आकाश, आकाशात विहरणारे पक्षी आणि स्वच्छ मोकळी हवा यांच्या जोडीला पर्यटकांना निवांत वेळामध्ये पुस्तकांच्या वाचनाबरोबरच गावकऱ्यांच्या आपुलकीचे आदरातिथ्यही अनुभवता येणार आहे. राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यातर्फे भिलारमध्ये पुस्तकांचा गाव ही भारतातील पहिलीच नावीन्यपूर्ण कल्पना साकारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (४ मे) ‘पुस्तकाच्या गावा’चे उद्घाटन होणार असून सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर, विनय मावळणकर आणि सांस्कृतिकमंत्र्यांचे विशेष अधिकारी श्रीपाद ढेकणे भिलारमध्ये तळ ठोकून आहेत.

भिलारमधील नागरिकांनी ‘पुस्तकांचा गाव’ ही संकल्पना केवळ उचलूनच धरली नाही, तर त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. भिलारच्या ग्रामपंचायतीने ठराव करून साडेतीन एकराची जागा सरकारकडे हस्तांतरित केली आहे. या प्रकल्पामध्ये निवड झालेल्या प्रत्येक घराला प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुस्तकांचे कपाट, रॅक आणि पुस्तकांच्या खरेदी यासाठी ८० हजार रुपये देण्यात आले आहेत.

२५ घरांमध्ये मिळून १२ हजार शीर्षकांचा समावेश असलेली १५ हजार पुस्तके वाचकांना उपलब्ध असतील. किमान २५ लोकप्रिय पुस्तके अशी आहेत की ती सर्वच घरांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. काही घरांमध्ये वाचकांना मुक्काम करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असून तेथे वाचकांना चहा-कॉफी किंवा नाश्ता माफक दरामध्ये मिळणार आहे. मर्यादित साधनसामग्रीचा वापर करून जोडय़ा लावा, गाळलेल्या जागा भरा असे शाब्दिक खेळ मुलांना अनुभवता येणार आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांसह ५० साहित्यिकांची छायाचित्रे आणि संक्षिप्त माहिती असलेले कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती काटीकर यांनी दिली. या पुस्तकांच्या गावाला पुण्यातील लेखक आणि कवींनी नुकतीच भेट देऊन या प्रकल्पाची माहिती घेतली. डॉ. न. म. जोशी, डॉ. माधवी वैद्य, डॉ. संगीता बर्वे, हेमा लेले, सुनील महाजन, राजूशेठ कावरे यांच्यासह शिरीष चिटणीस, माधव राजगुरु यांचा त्यामध्ये समावेश होता.

बोलकी पुस्तके

‘पुस्तकांच्या गावा’मध्ये आबालवृद्धांना वाचन करण्यासाठी पुस्तके असणार आहेतच, पण त्याच्याजोडीला बालकुमारांसाठी ‘बोलकी पुस्तके’ हा अभिनव प्रकल्पदेखील लवकरच सुरू करण्यात येईल. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची २०० पुस्तकांची पेटी ‘पेन ड्राईव्ह’वर ‘कन्व्हर्ट’ करण्यात आली असून त्या माध्यमातून मुलांना संगणकावरही या बोलक्या पुस्तकांचा आनंद लुटता येणार आहे, असेही आनंद काटीकर यांनी सांगितले.