पिंपरी चिंचवडमधल्या सगळय़ा नगरसेवकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीमुळे त्यांना काय वाटेल ते करण्याची मुभा मिळाली आहे, असे वाटते आहे. याचा अर्थ असा, की अशा सत्तेने धुंद झालेल्यांवर प्रामाणिक अधिकाऱ्याचा अंकुश असायलाच हवा. ज्यांनी कायद्याचे पालन करीत घरे घेतली आणि त्याचा कर ते भरत आहेत, अशा सुजाण नागरिकांनी एकत्र येऊनच या नगरसेवकांचा बंदोबस्त करायला हवा. पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे आणि तो दूर करण्याची हिंमत ना सत्ताधाऱ्यांमध्ये आहे, ना सामान्य नागरिकांमध्ये. न्यायालयांनी लक्ष घातले नसते, तर बेकायदा बांधकामे करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, याबद्दल त्यांच्या मनात जरासुद्धा शंका राहिली नसती. आयुक्तांवर अशी बांधकामे पाडण्याची जबाबदारी न्यायालयांनी सोपवली, म्हणून ती पाडण्याचे काम सुरू झाले. पण न्यायालयांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नसलेल्यांनी आयुक्तांचीच बदली केली. असे करून आपण खरेच मूर्ख आहोत, हे त्यांनी कबूल करून टाकले. या शहरातील नगरसेवकांना रोज दाराशी शेकडो नागरिकांनी भिकाऱ्यासारखे यायला हवे असते. किती का छोटे काम असेना, नगरसेवकाकडे भीक मागितल्याशिवाय ते पूर्ण होता कामा नये, असा त्यांचा आग्रह आहे. ‘सारथी’ हेल्पलाइन सुरू केल्यावर या नगरसेवकांच्या दारात गोंडा घोळणाऱ्यांची गर्दी एकदम हटली आणि त्यामुळे हे सारे जण बेचैन झाले. आपले महत्त्व कमी होते आहे, अशी त्यांची खात्री झाली. त्यामुळे ‘सारथी’वर तक्रार करणाऱ्यांची नावे संबंधित नगरसेवकाला सांगण्याचे आदेश देण्यात आले. ज्याच्या विरुद्ध तक्रार करायची, त्यालाच आपले नाव कळणार असेल, तर तक्रारच न करणे ते पसंत करतील. त्यांच्या धमक्यांनी आधीच घाबरलेल्या पिंपरीकरांना नगरसेवकांच्या या असल्या निर्लज्ज वागणुकीचा अनुभव अनेकदा आला आहे. पण अशा धाकात राहण्यापेक्षा बेकायदा बांधकामे करणारे आमदारच ज्या शहरात नेते म्हणून मिरवतात, तेथील पालिकेचे कर्मचारीही त्यांचीच री ओढणार, हे उघड आहे. उच्च न्यायालयाने आमदारांच्या अशा बांधकामांबद्दल ताशेरे मारल्यानंतरही त्याचे समर्थन करणे ही तर निर्लज्जपणाची परिसीमा झाली. अशा बांधकामांवर दंडही आकारता कामा नये, असा आग्रह याच नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत धरला. दंड वसूल करणाऱ्यांना बँडवाल्यांना फटकून काढा, अशी उद्धटासारखी सूचना एका नगरसेवकाने याच सभेत केली. निवडणुकीत कोण कोणाला फटकून काढतो, हे दाखवणे आता फारच आवश्यक झाले आहे. ज्या नागरिकांच्या मतांवर आपण निवडून येतो, त्यांच्याच कानफटात मारण्याएवढी हिंमत दाखवणाऱ्या या नगरसेवकांना सामान्य नागरिक केवळ मतांच्याच आधारे फटकावू शकतात. ज्या शहरात विरोधकच नसतात, तेथे सत्ताधाऱ्यांचा उर्मटपणा वाढीला लागतो. पिंपरी चिंचवड हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. सगळे शहर विकायला काढलेल्या या नगरसेवकांना वेळीच धडा शिकवला नाही, तर पिंपरी चिंचवडमध्ये सभ्य आणि सामान्यांना राहणे मुश्कील होईल. सत्ताधाऱ्यांचा हा खेळ तिथल्या प्रत्येकाच्या अंगलट येणारा आहे, हे आत्ताच लक्षात घेतले नाही, तर भविष्यकाळ आणखी अंधारलेला असेल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
धडा शिकवा
पिंपरी चिंचवडमधल्या सगळय़ा नगरसेवकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ज्यांनी कायद्याचे पालन करीत घरे घेतली आणि त्याचा कर ते भरत आहेत, अशा सुजाण नागरिकांनी या नगरसेवकांचा बंदोबस्त करायला हवा.
First published on: 22-02-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagaran