वेळ नाही, प्रचाराला जायचेय, साहेबांचा कार्यक्रम आहे, पक्षाची पत्रकार परिषद आहे, अशी कारणे देत पिंपरी विधानसभेतील प्रमुख उमेदवारांनी प्रश्नमंजूषेच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे आहे त्याच मंडळींच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकण्याची वेळ संयोजकांवर आली.
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाने पिंपरी मतदारसंघातील उमेदवारांसाठी ‘आमदार कोण हवा’ हा प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याकडे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे मनोज कांबळे, रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी प्रमुख उमेदवारांनी पाठ फिरवली. मनसेच्या अनीता सोनवणे, बसपाचे उमेदवार अॅड. क्षितिज गायकवाड, अपक्ष उमेदवार रामचंद्र माने, सुरेश लोंढे सहभागी झाले होते. तर, काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून शहराध्यक्ष सचिन साठे यांनी हजेरी लावली होती. आमदार सामान्य नागरिकांना भेट नाहीत, वेळ देत नाहीत, त्यांचे सर्व राजकारण टक्केवारीच्या भोवती फिरणारे आहे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवला नाही, अशी मते या वेळी व्यक्त करण्यात आली. झोपडपट्टय़ांचा प्रश्न, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, महिलांची स्वच्छतागृहे आदी प्रश्नांवर उपस्थितांनी विविध मते मांडली. प्रास्ताविक सायली कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन राहुल लोहगावकर यांनी केले.

Story img Loader