तबलावादक पांडुरंग मुखडे यांना माणिक वर्मा पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल तबलावादक पांडुरंग मुखडे यांना माणिक वर्मा पुरस्कार, तर उदयोन्मुख गायिका प्रियांका बर्वे हिला वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
शाखेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून बुधवारी (२५ मे) टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक अमिता तळेकर-धुमाळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक या वेळी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर कांबळेश्वर (ता. बारामती) येथील एस. पी. फाउंडेशन कलामंचचे कलाकार ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ हे विनोदी नाटक सादर करणार आहेत.
परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेले विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे : भार्गवराम आचरेकर पुरस्कार – स्वरांजली ऊर्फ शोभा काळे, बबनराव गोखले पुरस्कार – पद्मजा कुलकर्णी, मधुकर टिल्लू पुरस्कार – विजय कोटस्थाने, सुनील तारे पुरस्कार – लोकेश गुप्ते, गो. रा. जोशी पुरस्कार – सुशांत सांगवे, मधू कडू पुरस्कार – रवींद्र देशमुख, यशवंत दत्त पुरस्कार – नरेंद्र डोळे, पाश्र्वनाथ आळतेकर पुरस्कार – राज कुबेर, छोटा गंधर्व पुरस्कार – गजानन वाटाणे, रमाबाई गडकरी पुरस्कार – शारदा लक्ष्मण भोसले, दिवाकर पुरस्कार – रवींद्र घांगुर्डे, वसंत शिंदे पुरस्कार – श्रीप्रकाश सप्रे, राम नगरकर पुरस्कार – संदीप पायगुडे, शाखा कार्यकर्ता पुरस्कार – गिरीश गोडबोले, गंगाधरपंत लोंढे पुरस्कार – विश्वनाथ लिमये, मनोरमा नातू पुरस्कार – क्षितिज पटवर्धन, राज्य नाटय़ स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनय-दिग्दर्शन – श्रीकांत भिडे, नाटय़निर्मिती – ध्यास पुणे, स्त्री अभिनय – वरदा जाधव, कामगार कल्याण नाटय़स्पर्धा दिग्दर्शक – मनोज देशपांडे, अभिनय – दिलीप आंग्रे, प्रणिता दामले.