मावळातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा शेतकरी संपाला पाठिंबा

राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटले आहेत. सोमवारी (५ जून) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्यानंतर या संपास पाठिंबा म्हणून मावळातील सर्वपक्षीय आंदोलकांनी पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा काही काळासाठी बंद केला. शहरात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा होत असताना अचानक अशाप्रकारे पाणी बंद झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले.

शेतक ऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यास पाठिंबा देण्यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय शेतकरी पवना धरणावर एकत्र आले. पिंपरी-चिंचवडला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तो बंद करावा, अशी मागणी करणारे निवेदन मावळातील सर्वपक्षीय आंदोलकांच्या संयुक्त शिष्टमंडळाच्या वतीने या विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. पिंपरी-चिंचवडला होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी खंडित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. आंदोलकांच्या तीव्र भावना व कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मान्य करण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे काही काळ पाणीपुरवठा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दोन मे पासून शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार, शहरातील काही भागात एक दिवस तर इतर भागात दुसऱ्या दिवशी पाणी दिले जाते. पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची आंदोलकांची मागणी अधिकाऱ्यांनी तातडीने मान्य केली. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठय़ावर झाला. शहरातील पाणी व्यवस्था विस्कळीत झाली. यासंदर्भात, कोणतेही भाष्य करण्यास पालिका अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.

‘महाराष्ट्र बंद’च्या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक जमावाने धरणावर आले होते. त्यांनी पिंपरी-चिंचवडला करण्यात आलेला पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.

– मनोहर खाडे, अभियंता, पवना धरण क्षेत्र

Story img Loader