शहरात झालेला डेंग्यूचा प्रादुर्भाव आणि त्याकडे महापालिका प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, यावरून स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. डेंग्यूसाठी रूग्णालयातील खाटा वाढवा, खासगी रूग्णालयांमध्ये पालिका रूग्णालयातील दरांमध्ये तपासणी करा, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिले. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आधी खबरदारी घ्या, तहान लागल्यावर विहीर खोदू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
स्थायी समितीच्या एकूण सहा बैठकांचे कामकाज बुधवारी पार पडले. जवळपास ५१ कोटींच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली. त्याविषयी अध्यक्ष लांडगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहरात डेंग्यूचे रूग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत, त्यांच्यावर प्रभावी उपचार होत नाहीत. खासगी रूग्णालयातही रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, तेथे अव्वाच्या सव्वा शुल्कआकारणी केली जाते. यशवंतराव चव्हाण रूग्णालयात आकारण्यात येणाऱ्या दरातच खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूची तपासणी झाली पाहिजे, यादृष्टीने आयुक्त राजीव जाधव यांनी प्रयत्न करावेत. डेंग्यू, स्वाईन फ्लू यासारखे आजार फैलावतात, तोपर्यंत आपण काहीही करत नाही, नंतर धावपळ करत बसतो. त्यापेक्षा, आधीच खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लांडगे यांनी केली. चऱ्होलीत सांडपाणी थेट ओढय़ात सोडण्याच्या प्रकारावरून लांडगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांना डासांचा प्रचंड उपद्रव सहन करावा लागत असून आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. तेथील प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांना तेथे राहण्यास भाग पाडू, जेणेकरून त्यांना या त्रासाची कल्पना येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मोशीत पुण्याचा कचरा टाकण्यास विरोध
मोशी येथील गायरानाच्या जागेत पुण्याचा कचरा टाकण्यास तीव्र विरोध असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत मोशीत कचरा टाकू दिला जाणार नाही. याबाबतचा ठराव करून तो शासनाकडे पाठवू व त्याचा पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

Story img Loader