पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली. मात्र, १०० पैकी ४० टक्के क्षेत्र आराखडय़ास मंजुरी मिळाली होती. तथापि, उर्वरित ६० टक्के क्षेत्राचा आराखडा तयार करून शहरातील १०० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत. आगामी काळात कचऱ्याची समस्या उद्भवण्याचे संकेतही आयुक्तांनी दिले आहेत.
निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र व मोशीतील कचरा डेपोला आयुक्त जाधव यांनी भेट दिली. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर अभियंता महावीर कांबळे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, शरद जाधव, लियाकत पिरजादे, जयंत बरशेट्टी आदी या विभागातील अधिकारी उपस्थित होते. शहराला कशाप्रकारे पाणीपुरवठा होतो, समान पाणी देणाऱ्या ‘स्काडा’ प्रणालीची माहिती त्यांनी घेतली. केंद्र सरकारच्या नेहरू अभियानाअंतर्गत शहरातील ४० टक्के क्षेत्रासाठी २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पास नुकतीच मान्यता मिळाली आहे. उर्वरित ६० टक्के भागासाठी मान्यता मिळणे बाकी आहे. उर्वरित क्षेत्रासाठी आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी या वेळी दिल्या. शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.
तत्पूर्वी, आयुक्तांनी मोशी कचरा डेपोची पाहणी केली. आगामी काळात कचरा व त्याची विल्हेवाट या समस्या प्राधान्याने जाणवणार असून त्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी पर्यावरण विभागास दिले.

Story img Loader