यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सर्वाधिक अकरा निमंत्रणे आली असून त्यातील दोन संस्था पिंपरी -चिंचवड परिसरातील आहेत. ‘खर्च पेलण्याची क्षमता’ या निकषावर या दोन्ही संस्था तेवढय़ाच प्रबळ असल्याने दोघांपैकी एका संस्थेला यजमानपदाची संधी लाभली तरी, ८९ वे साहित्य संमेलन मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवड येथेच होणार आहे. यासंदर्भात रविवारी (९ ऑगस्ट) निर्णय होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी पुण्यामध्ये आले असून त्याचा कालावधी पुढील मार्चमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने हे अंतिम संमेलन ठरविताना पुण्याजवळचे आणि खर्च पेलण्याची क्षमता हे निकष महत्त्वाचे ठरणार आहेत. आगामी संमेलनासाठी अकरा निमंत्रणे आली असून साहित्य महामंडळाच्या इतिहासात सर्वाधिक निमंत्रणे येण्याचा हा विक्रमच आहे. त्यामध्ये पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे, त्याचप्रमााणे पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा यांनी संयुक्तपणे दिलेल्या निमंत्रणाचा समावेश आहे. या संस्थेचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील हे त्रिपुराचे राज्यपाल होते. तर, पिंपरी-चिंचवड परिसरातील राजकीय नेते भाऊसाहेब भोईर हे कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.
साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यामध्ये आल्यानंतर पहिले संमेलन आचार्य अत्रे यांची कर्मभूमी असलेल्या सासवड येथे झाले होते. तर, गेल्या वर्षी संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे संमेलन घेण्यात आले होते. आता विद्यमान पदाधिकाऱ्यांना अखेरचे संमेलन ठरविण्याची संधी असून त्यासाठी नजीकता महत्त्वाची ठरणार आहे. तब्बल चार वर्षांनी अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन निश्चित करताना महामंडळाने खर्च पेलण्याची क्षमता या निकषावरच ऑफबीट डेस्टिनेशन्स आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांनी संयुक्तपणे दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला होता. आतादेखील हा निकष महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील दोन प्रबळ दावेदारांपैकी संमेलन कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
श्रीगोंदा येथे आज भेट
साहित्य महामंडळाला मिळालेल्या अकरा निमंत्रणांपैकी काही ठिकाणी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देत आहे. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली स्थळ निवड समितीने चार ठिकाणी भेट दिल्या आहेत. महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन हेही शनिवारी (८ ऑगस्ट) श्रीगोंदा येथे भेट देणाऱ्या समितीमध्ये असतील. स्थळ निवड समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर रविवारी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळ निश्चित केले जाणार आहे.
आगामी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडलाच!
यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सर्वाधिक अकरा निमंत्रणे आली असून त्यातील दोन संस्था पिंपरी -चिंचवड परिसरातील आहेत.
आणखी वाचा
First published on: 08-08-2015 at 03:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya sammelan pimpri chinchwad