पळून जाऊन लग्न करण्यासाठी, कमी खर्चातील लग्नासाठी किंवा अगदी धूमधडाक्यात होणाऱ्या लग्नांसाठीसुद्धा प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे आळंदी! परंतु आता याच आळंदीत लग्न करणे पूर्वीइतके सोयीचे राहिलेले नाही, कारण आळंदी नगरपरिषदेने नव्या आर्थिक वर्षांपासून विविध प्रकारचे कर बसवले असून, त्याचा परिणाम म्हणून तेथील लग्ने महागली आहेत.
हरतऱ्हेच्या लग्नासाठी आळंदी कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. आई-वडील, पालक आणि नातेवाईकांचा विरोध असेल तर लग्न करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे आळंदी. तेथे अगदी कमी खर्चात लग्नं होतात. काही धर्मशाळा त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळात आळंदी येथे मोठी मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. तेथे अगदी धूमधडाक्यात लग्ने होतात. तेथे कराचे प्रमाण फारसे नसल्याने आणि इतरही दर तुलनेने कमी असल्याने लग्ने परवडणारी होती. मात्र, आळंदी नगर परिषदेने करांमध्ये वाढ केली आहे. विशेषत: व्यावसायिक आस्थापनांसाठी ही वाढ मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील लग्ने महागणार आहेत. त्यांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
आता प्रत्येक विवाहासाठी १ एक हजार रुपये कर द्यावा लागणार आहे. याचबरोबर मंगल कार्यालयांसाठी वार्षिक परवान्यासाठी पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपट्टी म्हणून तीन हजार ते दहा हजार रुपये भरावे लागणार आहेत. इतकेच नव्हे तर स्वच्छता करातही वाढ करण्यात आली असून, तो आता पाच हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येणार आहे. या सर्व वाढवलेल्या करांचा बोजा अखेर लग्नाच्या यजमानांवरच पडणार आहे, त्यामुळे या महिन्यापासून आळंदी येथे लग्ने पूर्वीसारखी सोयीची राहणार नाहीत, अशी माहिती तेथील कार्यालयांच्या मालकांनी दिली.
१ एप्रिलपासून वाढलेले कर
*विवाहनोंदणी शुल्क : १००० रुपये (प्रति विवाह)
*कार्यालयांसाठी सेवाशुल्क : १००० (प्रति विवाह)
*कार्यालयांसाठी लग्नशुल्क : १००० (प्रति विवाह)
*पाणीपट्टी (धर्मशाळा, मंगल कार्यालये) : तीन ते दहा हजार रु.
*विशेष स्वच्छता कर (धर्मशाळा, कार्यालये) : पाच हजार रुपये.