चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून भरीव विकासकामे केली, या पट्टय़ात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या मोठी असल्याचे सांगत काँग्रेसकडील चिंचवड मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी महापौर शकुंतला धराडे यांच्यासह पक्षाच्या २० नगरसेवकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या पक्षातील पुनरप्रवेशाच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचे मानले जाते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार, अशी घोषणा केली, तेव्हा काँग्रेसने थयथयाट केला. तीनपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला देण्याची मागणीही केली होती. आता राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे चिंचवडची मागणी करण्यात आली. महापौर धराडे, शमीम पठाण, गोरक्ष लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची भूमिका मांडली. तेव्हा माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, झामाबाई बारणे, शैलजा शितोळे, नीता पाडाळे, माया बारणे, आशा सूर्यवंशी, सुमन नेटके, सुजीत पाटील, शेखर ओव्हाळ, शत्रुघ्न काटे, राजेंद्र जगताप, नवनाथ जगताप, बाळासाहेब तरस, कैलास थोपटे, विनायक गायकवाड, सविता खुळे, नाना शिवले, चेतन भुजबळ आदी जगताप समर्थक उपस्थित होते. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असून अजितदादांमुळे शहराचा विकास झाला आहे. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने तो मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा आणि निवडून येऊ शकेल असा उमेदवार द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. लक्ष्मण जगताप यांच्यासाठीच चिंचवडची मागणी समर्थकांनी केल्याचे ‘उघड गुपित’ होते. तथापि, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशी सारवासारव या वेळी करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2014 रोजी प्रकाशित
चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडा; महापौरांसह २० नगरसेवकांची मागणी
चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी महापौर शकुंतला धराडे यांच्यासह पक्षाच्या २० नगरसेवकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

First published on: 14-09-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor with 20 corporators demand about chinchvad constituency