मोठा गाजावाजा करत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा एक भाग म्हणून पिंपरी पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांची अवघ्या दहा दिवसांतच दुरवस्था झाली आहे. काही झाडे सुकली असून काही झाडे पूर्णपणे जळून गेली आहेत. तर, काही झाडे जनावरांनी खाऊन टाकली आहेत.

राज्य शासनाच्या वतीने चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात, मुनगंटीवार यांच्या छायाचित्रासह मोठमोठय़ा जाहिराती वाहिन्या तसेच वृत्तपत्रांद्वारे करण्यात आल्या आहेत. याच मोहिमेअंतर्गत पिंपरी पालिकेने ५० हजार झाडे लावणार असल्याचे जाहीर केले होते. मुनगंटीवार तीन जुलैला पुण्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा दुपारी त्यांच्या हस्ते पिंपरीत वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालयालगत डेअरी फार्मच्या जागेत हे वृक्षारोपण करण्यात आले. महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे आदी पालिकेचे पदाधिकारी तसेच अधिकारी या वेळी उपस्थित होते. नागरिकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने दोन शाळेतील ४०० ते ५०० विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. मंत्र्यांना येण्यास दीड-दोन तास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले होते. त्याचप्रमाणे, ‘मानापमान’ नाटय़ झाल्याने या प्रभागातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

या कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी चार कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाची माहिती देतानाच पिंपरी पालिकेच्या वतीने ५० हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले होते. मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण केल्यानंतर या ठिकाणी तीन हजार झाडे लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. तथापि, त्याची अपेक्षित काळजी घेतली गेली नाही. बुधवारी सकाळी याबाबतची छायाचित्रे घेतली असता, काही झाडे सुकून गेली असून काही झाडे पूर्णपणे जळून गेली आहेत. बरीच झाडे जनावरांनी खाऊन टाकली आहेत. याशिवाय, चऱ्होलीत एक हजार झाडे लावण्याचा संकल्प असून तेथे अद्याप झाडे लावण्यास सुरुवात झाली नाही. तळवडय़ात तीन हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे, त्याही ठिकाणी फक्त खड्डे खोदून ठेवले असल्याचे सांगण्यात येते.