िपपरी महापालिकेच्या वतीने नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिवणयंत्र वाटपात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा पुढे करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मनसेचे पालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्विनी चिखले, युवा आघाडीचे प्रमुख सचिन चिखले, राजू सावळे, रूपेश पटेकर आदींसह जवळपास १५० ते २०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मनसेच्या वतीने काढण्यात आलेला हा निषेध मोर्चा पालिकेच्या मुख्यालयात नेण्यात आला. तेथेच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या नागरवस्ती योजनेअंतर्गत २०१० ते २०१५ या कालावधीत शहरातील महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार होत्या. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास १३ हजार महिलांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. तथापि, गेल्या काही वर्षांपासून पात्र लाभार्थीना शिवणयंत्रांचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करतात. मात्र, त्याचा काही उपयोग होत नसल्याचा मुद्दा मनसेने आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे. योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.