नरेंद्र मोदी यांचे सरकार म्हणजे उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील व्यापक कटाचा भाग आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. अच्छे दिन येणार होते, वर्षभरात ते कुठेच दिसत नसल्याचे सांगत मोदींचे मालक नागपुरात नसून बारामतीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मोहननगरच्या लोकमान्य व्याख्यानमालेत ‘लोकशाहीचा मालक कोण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानव कांबळे होते. संयोजक मारूती भापकर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, बारामतीच्या मालकापासून नागरिकांची मुक्तता होणे कठीण आहे. मोदींचे सरकार हे एका व्यापक कटातून निवडून आले आहे. तो कट उद्योगपती आणि राजकारणी यांनी केला असून त्यास बुध्दिवाद्यांनी साथ दिली आहे. सुशिक्षित म्हणवणारे फेसबुकवरून काय प्रचार करत होते. वाहिन्यांवर सातत्याने मोदींचे दर्शन होत होते, त्यासाठी काही हजार कोटींचा खर्च केला गेला. निवडणुकीपूर्वी झालेल्या सौदेबाजीतून आता भूमी अधिग्रहन कायदा होतो आहे. उद्योगपतींना जे द्यायचे ठरले, ते देण्याची वेळ आली आहे. जमिनींची मालकी हाच मुद्दा पुढच्या काळात कळीचा ठरणार आहे. परदेशात जाऊन मोदी भांडवल मागत आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी हीच मंडळी स्वदेशीचा नारा देत होते. आता त्यांचे स्वयंसेवक भांडवलाची याचना करत फिरत आहेत, हा विरोधाभास आहे. ६७ वर्षांनंतरही आपल्या लोकशाहीचा मालक कोण हेच ठरत नाही, ही अवस्था म्हणजे मालक नसलेल्या पडीक शेतीप्रमाणे आहे. सत्तेत असणारा कालचा बरा होता, अशी म्हणण्याची वेळ येते.

Story img Loader