पिंपरी महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अपंग महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचे प्रकरण पालिका सभेत उघड झाले आणि सर्वच अवाक झाले. या प्रकरणी संबंधित डॉक्टर व महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली असून चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सभेत दिले.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. ही महिला अपंग असून मुलगा मतिमंद आहे. १० ऑगस्टला या महिलेने डॉ. संजय पोटे यांच्याविरुद्ध तक्रार केली. डॉक्टर आपल्याशी लगट करतात, सातत्याने स्पर्श करतात, सेवेत कायम करण्यासाठी शिफारस करतो, असे सूचकपणे सांगतात, विनाकारण त्रास देतात. घटनेच्या दिवशी त्यांनी पाण्याची बाटली मागितली. ती देत असताना हात धरला व जवळ ओढले, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पालिका रुग्णालयात असा प्रकार घडणे अशोभनीय आहेत. डॉक्टरच असे करणार असतील, तर बघायचे कोणाकडे, असा मुद्दा उपस्थित करून डॉ. पोटे यांना निलंबित करा, अशी मागणी साने यांनी केली. यासंदर्भात, आयुक्त परदेशी म्हणाले, त्या महिलेने काम व्यवस्थित केले नाही म्हणून तिला नोटीस बजावण्यात आली होती. तिने नोटीस घेण्यास नकारही दिला होता. सूडभावनेने तिने आपल्याविरुद्ध तक्रार केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर दोघांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. याबाबतच्या चौकशीत दोघांच्या तक्रारींचा अभ्यास सुरू आहे. दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
डॉक्टरने विनयभंग केल्याची अपंग महिला कर्मचाऱ्याची तक्रार
पिंपरी महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अपंग महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचे प्रकरण पालिका सभेत उघड झाले.
First published on: 22-11-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molested by pcmc medical officer