राज्यात शनिवार-रविवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले असून, पुढील दोनतीन दिवसांत त्याचा जोर कायम राहणार आहे. त्यापैकी एखादा दिवस अतिवृष्टीचा असेल, असे अंदाज हवामान विभागाने म्हटले आहे. आतापर्यंत कमी पाऊस असलेल्या मराठवाडय़ातही मंगळवारी सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या पावसामुळे राज्यातील धरणांमधील एकूण साठा ५१ टक्क्य़ांवर पोहोचला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी झारखंड आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या भागावर होते. तसेच, अरबी समुद्रात केरळ ते गुजरात किनारपट्टीलगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. विशेषत: कोकण, घाटक्षेत्र आणि पुण्याच्या परिसरात पाऊस अधिक होता. गेल्या शनिवारी-रविवारी पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याने जोर धरला आहे. हीच स्थिती ७ ऑगस्टपर्यंत कायम राहील. त्यापैकी कोकणात बुधवारचा दिवस व मध्य महाराष्ट्रात एखादा दिवस अतिवृष्टीचा असेल. मंगळवारी राज्याच्या सर्वच भागात पाऊस असेल. विदर्भात त्याचे प्रमाण जास्त असेल. मंगळवारी मराठवाडय़ातही बहुतांश भागात पाऊस पडू शकेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात सोमवारी दिवसभरात पडलेला पाऊस असा (मिलिमीटरमध्ये)- पुणे १४, अहमदनगर ४, कोल्हापूर १, महाबळेश्वर ११९, नाशिक ८, सांगली १, सातारा ६, सोलापूर ६, मुंबई कुलाबा १६, अलिबाग ५७, रत्नागिरी ३, डहाणू १, उस्मानाबाद ४, औरंगाबाद ३, परभणी ३, ब्रह्मपुरी २६, चंद्रपूर २, गोंदिया ६१, नागपूर ९. घाट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठय़ात वाढ होणे सुरूच आहे. राज्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा ५१ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. कोकणातील धरणे ७५ टक्के भरली आहेत. इतर भागातील टक्केवारी अशी- नागपूर विभाग ६५, अमरावती विभाग ४५, नाशिक विभाग ३७, पुणे विभाग ६०, मराठवाडा विभाग १७ टक्के.

Story img Loader