मराठी माणसांनी केलेल्या लेखनामुळे कन्नड साहित्य समृद्ध झाले. त्याची परिणती ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्यांच्या यादीमध्ये दिसते. तर, १९४८ मध्ये झालेल्या गांधी हत्येनंतर अतिसभ्यतेची कास धरल्यानेच मराठी साहित्याने आपला बाज हरवला, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी गिरीश कर्नाड यांनी सोमवारी व्यक्त केले.
अक्षरधारातर्फे भरविण्यात आलेल्या ‘माय मराठी शब्दोत्सव’ प्रदर्शनांतर्गत ‘खेळता खेळता आयुष्य’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त माधव वझे आणि रेखा इनामदार-साने यांनी गिरीश कर्नाड यांची मुलाखत घेतली. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक पी. एन. देशपांडे आणि अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या.
कन्नड भाषेला १९५६ पर्यंत स्वत:चा प्रांत नव्हता. मुंबई, मद्रास आणि म्हैसूर अशा तीन प्रांतामध्ये कर्नाटक विभागला गेला होता. द. रा. बेंद्रे आणि शं. भा. जोशी या मराठी माणसांनी केलेल्या लेखनामुळे कन्नड भाषा समृद्ध झाली. या दोघांना खरे तर, मराठीमध्ये लेखन करता आले असते. पण, त्या वेळी पुणे हे मराठी साहित्याचे केंद्र होते. मराठीत लेखन केले असते, तर ‘धारवाडचा मराठी लेखक’ अशीच त्यांची ओळख झाली असती. म्हणूनच या दोघांनी कन्नडमध्ये लेखन केले, याकडे लक्ष वेधून कर्नाड म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत मराठी साहित्य समृद्ध होते. मात्र, १९४८ मध्ये झालेल्या गांधी हत्येनंतर अतिसभ्यतेची कास धरल्यामुळे मराठी साहित्याने आपला बाज हरवला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे या शहरांमध्ये नागर संवेदनांचे साहित्य आहे. कर्नाटकामध्ये बंगळुरू वगळता एकही मोठे शहर नाही. त्यामुळे मराठीमध्ये असलेला ग्रामीण साहित्य हा स्वतंत्र वाङ्मय प्रकार कन्नडमध्ये नाही. जे आहे तेच मुळी ग्रामीण साहित्य आहे. उत्तर कर्नाकटाच्या कन्नड भाषेवर मराठीची छाया आहे.
आईच्या डायरीतील लेखनापासूनच मला आत्मचरित्र लेखनाची प्रेरणा मिळाली. घरामध्ये तीन काकांच्या मुलींबरोबरच मी वाढत गेलो. त्यामुळेच माझा स्त्री व्यक्तिरेखांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला, असे सांगून कर्नाड यांनी या पुस्तकामध्ये माझ्या वयाच्या ३५ वर्षांपर्यंतचा भाग आला असल्याने आत्मचरित्राचा दुसरा भाग देखील येऊ शकतो, असे सूचित केले.
नाटक आणि समकालीनता
‘तुघलक’ नाटकात गडाला पहारा देणारा रखवालदार दुसऱ्या सहकाऱ्याला ‘ही तटबंदी भक्कम आहे. गड कोसळला तर तो आतून पोखरल्यामुळेच..’ असे म्हणतो. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर या नाटकाचा दिल्लीला प्रयोग सुरू असताना या संवादाचे महत्त्व प्रेक्षकांना ध्यानात आले. तर, ‘घाशीराम’मध्ये तेंडुलकर यांनी जे लिहिले ते आपण भिन्द्रानवाले यांच्या रूपाने पाहिले आहे, याकडे लक्ष वेधत गिरीश कर्नाड यांनी नाटक आणि समकालीनता हा मुद्दा उलगडला.

Story img Loader