एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे. पिंपरीत विनापरवाना सभा घेतल्यामुळे खासदार गजानन बाबर यांना अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांनी त्यांना मोटारीत बसवून नेण्याचा प्रयत्न केला असतानाच व्यापाऱ्यांनी गाडीला घेराव घातला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगवले.
पिंपरी बाजारपेठेत शगुन चौकात बाबर यांनी सभा घेऊन एलबीटीचा विरोध कायम असल्याची भूमिका मांडली. विनापरवाना सभा घेतल्याचे कारण सांगत पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांनी बाबर यांच्यासह भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवार, नगरसेवक सीमा सावळे, आशा शेंडगे, माजी नगरसेवक भीमा बोबडे, योगेश बाबर, रोमी संधू, गोपी आसवानी, हरेश जमतानी, राजेश तेजवानी, महेश गोस्वामी या ११ जणांविरूध्द गुन्हा केला व त्यांना अटक केली. पोलिसांनी बाबर यांना मोटारीत बसवताच व्यापाऱ्यांनी चारही बाजूने गाडीला घेराव घातला. ते मोटारीला पुढे जाऊन देत नव्हते व धक्काबुक्की करू लागले. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यानंतर व्यापारी पांगले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना नंतर जामीनावर सोडण्यात आले. उशिरापर्यंत पोलिसांची आंदोलक व्यापाऱ्यांची धरपकड सुरू होती.

Story img Loader