महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान
निगडी ओटा स्कीम पेठ २२ येथील महापालिकेच्या शाळेत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्चदाब विद्युत रोहित्रामधून (डीपी) वीजचोरी सुरू असून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आकडे टाकून घेतलेली वीज विकण्याचा धंदाच सुरू केला आहे. एकाच केबलमधून आणलेली वीज अनेक व्यावसायिक तसेच रहिवाशांना विकून महिना तीनशे ते पाचशे रुपये घेतले जातत. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
महापालिकेची निगडी ओटा स्कीम येथे कै. मधुकर पवळे शाळा असून शाळेची इमारत चार मजली आहे. शाळेच्या आवारात असलेल्या विद्युत रोहित्रामधून धोकादायक पद्धतीने वीज केबल टाकली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. रोहित्रमधून टाकलेल्या केबलचे अक्षरक्ष: जाळे निर्माण झाले आहे. आकडे टाकलेल्या केबल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सहज दिसतात. लाखो रुपयांची वीजचोरी राजरोसपणे सुरू आहे. केबल उघडय़ावर असल्याने तेथील लोखंडी जाळ्यांमध्ये वीज उतरून धोका होऊ शकतो. चोरीची ही वीज अंकुश चौकापर्यंतच्या पानटपऱ्या भाजी मंडईतील गाळे, तसेच पथारीवाल्यांना विकली जाते. त्यातून लाखो रुपयांचे अर्थकारण आहे.पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेच्या मदानाच्या एका कोपऱ्यात रोहित्र बसविण्यात आले आहे. या रोहित्राच्या सर्व बाजूंनी लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. तरीही उच्चदाब रोहित्रामधून केबल टाकून वीजचोरी केली जाते. शाळेतील मुले मदानावर खेळण्यास आल्यानंतर चुकून त्या केबलला हात लागला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेल्या आकडय़ांमुळे अनेक वेळा रोहित्राचे स्फोटही होत असतात, मात्र त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
निगडी पेठ २२ ओटा स्किम येथे महावितरणने अनधिकृतपणे होत असलेल्या वीजचोरीवर कारवाई केली आहे. तरीही त्या ठिकाणी वीजचोरी रोखण्यासाठी आणखी मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे.
-राजेश गुजर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण प्राधिकरण