खासदार गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांना पिंपरीचे शहराध्यक्षपद मिळवून देण्यासाठी शहरातील मुंडे गटाचे पाठबळ महत्त्वाचे ठरले होते. मात्र, अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत हे चित्र बदलले असून, आता खाडे यांच्या मनमानी कारभाराला मुंडे गटच वैतागला आहे. याबाबत ‘साहेबांकडे’ तक्रार करायची आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, अशा विवंचनेत हा गट आहे.
मुंडे यांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून खाडे यांच्याकडे पाहिले जाते. त्याचा फायदा खाडे यांना यापूर्वी अनेकदा झाला आहे. अनेकजण शर्यतीत असताना मुंडे यांच्याच आशीर्वादामुळे खाडेंची शहराध्यक्षपदाची लॉटरी लागली. गडकरी गटाची जिरवली, या आनंदात मुंडे गटाने तेव्हा प्रचंड जल्लोष केला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. गेल्या दोन महिन्यात खाडे यांची कार्यपध्दती मुंडे गटातील प्रमुखांनाच रुचली नाही. त्यामुळे सध्या पदाधिकाऱ्यांमध्ये तप्त वातावरण आहे. खाडे कोणाचेही ऐकत नाहीत, कुरघोडीचे राजकारण करतात, एकमेकांमध्ये भांडणे लावतात, चारचौघात अपमान करतात, यशाचे श्रेय स्वत:कडे व अपयशाचे खापर कार्यकर्त्यांवर फोडतात, अशा अनेक तक्रारी आहेत. तथापि, खाडेंना त्या मान्य नाहीत. शहराध्यक्षाविषयी असलेली तीव्र नाराजी मुंडे यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, ते काम करणार कोण, अशी अडचण आहे.
पिंपरीत मुंडे समर्थक शहराध्यक्षाच्या मनमानीला मुंडे गटच वैतागला
गेल्या दोन महिन्यात खाडे यांची कार्यपध्दती मुंडे गटातील प्रमुखांनाच रुचली नाही. त्यामुळे सध्या पदाधिकाऱ्यांमध्ये तप्त वातावरण आहे.
First published on: 29-11-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munde group in pimpri gets rid of sadashiv khade