सध्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच शिवसेनेने त्यांना आकर्षक ‘ऑफर’ दिली आहे. तथापि, लांडगे यांनी होकार अथवा नकार न देता चर्चेचे गुऱ्हाळ कायम ठेवले आहे.
पिंपरी पालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत महेश लांडगे राष्ट्रवादीच्या तिकीटावर भोसरीतून निवडून आले. राष्ट्रवादीकडून ते स्थायी समिती अध्यक्षही झाले. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष लढले व निवडूनही आले. राज्यातील सत्ताधारी भाजपला आमदारांची कमतरता जाणवत असल्याने अपक्ष आमदारांना त्यांनी आपल्याकडे खेचले. पाच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी भाजपसोबत राहावे, यासाठी त्यांना सत्तेचा ‘लाभ’ मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. त्यापैकीच एक लांडगे यांनाही ‘लाल दिव्या’चे गाजर दाखवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी व मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक लक्षात घेता लांडगे भाजपच्या वाटेवर असल्याचे मानले जाते.
अशा परिस्थितीत, लांडगे यांची स्थानिक पातळीवरील ताकद लक्षात घेऊन व आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचा पुरेपूर फायदा पक्षाला होईल, या हेतूने त्यांना शिवसेनेत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात, काही बैठकाही झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा घडवून आणण्याचे व पुढील ‘शब्द’ देण्याची तयारी मध्यस्थी नेत्यांनी दर्शवली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेत येण्यास लांडगे इच्छुक होते. मात्र, तेव्हा त्यांना उमेदवारी देण्यास सेनावर्तुळातील प्रस्थापितांनी तीव्र विरोध केला. त्या वेळी त्यांना मिळालेल्या वागणुकीवरून ते कमालीचे नाराजही होते. स्वबळावर ते आमदार झाले. आता आगामी महापालिका व त्यानंतरच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी लांडगे यांची उपयुक्तता मोठी आहे, याचा साक्षात्कार सेना नेत्यांना झाला असून त्यांना पक्षात आणण्यासाठी चहूबाजूने प्रयत्न सुरू झाले आहेत. तूर्त, लांडगे यांनी फारसा उत्साह दाखवला नसल्याचे समजते.

Story img Loader