उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला असून त्यांच्या कोलांटउडीमुळे त्यांचे समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. महापौर शकुंतला धराडे यांच्यासह जे २५ नगरसेवक जगतापांनी राष्ट्रवादीकडून लढावे, यासाठी आग्रही होते, त्या सर्वाची भलतीच पंचाईत झाली आहे. नेताच दुसरीकडे गेल्याने ‘पक्ष की नेता, कोणता झेंडा घेऊ हाती’ असा प्रश्न त्यांना पडला आहे.
लक्ष्मण जगताप भाजपमध्ये गेले तरी त्यांचे समर्थक राष्ट्रवादीतच आहेत. त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जगतापांनी भाजपशी घरोबा केला आणि चिंचवडसाठी भाजपची उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात असलेले समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवार शोधण्याची नामुष्की ओढावली. शिवसेनेच्या तिकिटासाठी रांगेत असलेले माजी नगरसेवक नाना काटे यांच्याकडे विचारणा करण्यात आली असून अन्य पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे समजते. धराडे यांना महापौरपद मिळवून देण्यात जगतापांचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे, जगताप समर्थक नगरसेवकांना तिकीट देण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत जगतापांची भूमिका निर्णायक होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घ्यावी, याविषयी त्यांच्यात संभ्रमावस्था आहे. पक्षाबरोबर राहून राष्ट्रवादीचे काम करायचे की नेत्यासोबत जाऊन भाजपचे कमळ फुलवायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अवघड जागेचे दुखणे असल्याने ही अडचण कोणाला सांगता येत नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे काम करणार- महापौर
अजितदादांनी लक्ष्मण जगताप यांच्या शिफारशीमुळे शकुंतला धराडे यांना महापौरपद दिले. जगताप आता भाजपचे उमेदवार असल्याने महापौरांची भूमिका काय, याविषयी उत्सुकता आहे. तथापि, राष्ट्रवादीकडून महापौरपद मिळाल्याचे सांगून आपण कोणत्याही परिस्थितीत जगतापांचे काम करणार नाही. तर, राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचे काम करू, असे महापौरांनी पत्रकारांशी  स्पष्ट केले.

Story img Loader