नगरपालिका निवडणुकांचे निकाल चांगले लागले, तसेच महापालिकेचे निकालही लागतील. आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्यामुळे भाजपा सशक्त झाली असून, राष्ट्रवादी ‘रिकामी’ झाली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत ‘पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमुक्त’ होईल, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तळवडे-रुपीनगर येथे बोलताना व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांनी ३५ वर्षांच्या राजकारणात कायम संघर्ष केल्याचे सांगत पिता म्हणून त्यांचा फारच कमी वेळ आपल्याला मिळाला, असेही त्या म्हणाल्या.

बीड जिल्हा मित्रमंडळ, मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठान आणि भगवान सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रुपीनगर येथे आयोजित गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, आयोजक रघुनंदन घुले आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, की देशात एकाच घराण्याची सत्ता कित्येक वर्षे होती. मात्र, एक चहावाला पंतप्रधान झाला. सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती विकासाचे ध्येय ठेवून देशाच्या सर्वोच्च पदावर बसू शकते, हे देशाने दाखवून दिले. एखादा निर्णय कठोर असला व सामान्य जनता पाठीशी असल्यास राजकीय दृष्टिकोनातून कितीही विरोध झाला तरी तो नगण्य ठरतो. नोटाबंदीचा निर्णय तसाच आहे. नोटाबंदीमुळे समाजातील सर्व घटक एका रांगेत आले आहेत. कष्टाने कमविलेल्या पैशाला न्याय मिळवून देण्याचे काम नोटाबंदीमुळे झाले आहे. या निर्णयामुळे सशक्त आर्थिक व्यवस्था निर्माण होणार आहे. जातीचे, धर्माचे राजकारणातील प्रयोग आता खोटे ठरणार आहेत आणि विकासाचा मार्ग स्वीकारला जाणार आहे. कारण, जनतेला विकास हवा आहे.

‘मोबाइलमधून कॅमेरा काढून टाकला पाहिजे’

तरुणाईच्या उत्साहाचे कौतुक करतानाच मुंडे, महाजन यांच्या काळात असलेली मर्यादा, शिस्त पाळली गेली पाहिजे. तरुणांचा ‘सेल्फी’चा गोंधळ पाहून पंतप्रधानांना पत्र लिहून मोबाइलमधून कॅमेरा काढून टाकावा, अशी विनंती करणार असल्याची टिप्पणीही पंकजा मुंडे यांनी या वेळी केली.