पिंपरीत खराळवाडी येथे असलेल्या साई भवन या इमारतीत तळमजल्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय व इमारतीतील अन्य आठ कार्यालये मंगळवारी पहाटे चोरटय़ांनी फोडली. राष्ट्रवादीचे निवासी कार्यालयीन सचिव रामदास मोरे व अन्य एकास चोरटय़ांनी बेदम मारहाण केली आहे. शेजारी-शेजारी असलेल्या दोन इमारतींच्या सुरक्षारक्षकांनी मिळून काही जणांच्या मदतीने हा धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास मोरे व त्यांचा रिक्षाचालक मित्र दत्ता साळुंके झोपलेले असताना चार-पाच जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण करून व त्यांचे हात-पाय बांधून त्यांना शौचालयात कोंडून ठेवण्यात आले. ते खूप आरडाओरड करत असल्याने तोंडात बोळा कोंबून त्यांच्या अंगावर गाद्या व अन्य कपडे टाकण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास ‘मॉर्निग वॉक’ला चाललेल्या वृध्द जोडप्याने आवाज ऐकल्यानंतर त्यांची सोडवणूक केली. चोरटय़ांनी इमारतीचे मालक कृपलानी यांचे कार्यालय, तुळशीदास शिंदे यांचे कार्यालय, एसआरएल पॅथॉलॉजी लॅब फोडले. त्याचप्रमाणे, ओंकार एंटरप्रायजेज, जीआयसी हौसिंग फायनान्स व शिल्ड कंपनीचे कार्यालयही फोडले. या घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यालयातून रोख ३५ हजार रुपये चोरण्यात आले असून कार्यालयातील अन्य मौल्यवान वस्तूही गायब झाल्या आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेजारी-शेजारी असलेल्या दोन इमारतींचे सुरक्षारक्षक एकाच गावचे आहेत. त्यांनी काहींच्या मदतीने या घरफोडय़ा केल्याची प्राथमिक माहिती जबाबांमधून पुढे आली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Story img Loader