जगात सध्या अस्तित्वात असलेल्या महादुर्बिणींच्या ५० पट मोठय़ा आणि विश्वातील अनेक गुपिते उलगडण्यास भविष्यात मदत करणाऱ्या ‘स्केअर किलोमीटर अॅरे’ (स्का) या महाप्रचंड दुर्बिणीचे व्यवस्थापन करण्याची महत्त्वाची जबाबदारी पुण्यातील ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स’ (एनसीआरए) या संस्थेकडे आली आहे. जगातील ११ देश मिळून पुढील आठ वर्षांत ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे ही दुर्बीण उभारणार असून, आताच्या हिशेबानुसार या प्रकल्पाची किंमत ६५० दशलक्ष युरोंच्या (सुमारे ५५०० कोटी रुपये) घरात जाणार आहे. या दुर्बिणीमुळे विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला असलेल्या स्थितीवर प्रकाश पडेल. तसेच, भौतिकशास्त्रातील अनेक नियमांबाबत आकलन वाढण्यास मदत होणार आहे.
‘एनसीआरए’चे केंद्रसंचालक एस. के. घोष व प्रो. यशवंत गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी या प्रकल्पात सहभागी असलेले ‘एनसीआरए’चे डॉ. योगेश वाडदेकर, डॉ. नीरज रामानुजम, टाटा रीसर्च सेंटरचे डॉ. स्वामीनाथन, तसेच, ब्रिटनमधील प्रो. टिम कॉर्नवेल, अॅलन ब्रिजेस, इटलीचे रिकाडरे स्मारेसिओ आणि दक्षिण आफ्रिकच्या लिझ हीवर हे उपस्थित होते.
ही दुर्बीण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील अतिशय कमी वस्ती असलेल्या भागात उभी राहणार आहे. दुर्बिणीची रचना कशी असावी याबाबतचे नियोजन करण्यासाठी पुण्यात बैठक झाली. या प्रकल्पामध्ये ब्रिटन, जर्मनी, इटली, नेदरलॅन्ड, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, चीन हे देशही सहभागी आहेत. स्का प्रकल्पातील महादुर्बिणीचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. या शिवाय ती उभारताना त्याचे व्यवस्थापन भारतीय म्हणजेच ‘एनसीआरए’ मधील संशोधकांकडे असेल. ‘अशी दुर्बीण असावी याबाबत गेली १५-२० वर्षे चर्चा सुरू होती. ती आता प्रत्यक्षात येत आहे. त्याचे विविध टप्पे आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर साधारणत: २०२१-२२ सालापर्यंत त्याद्वारे निरीक्षणे घेता येतील. या दुर्बिणीची क्षमता आता अस्तित्वात असलेल्या दुर्बिणींच्या तुलनेत तब्बल ५० पट जास्त असेल. त्यामुळे विश्वातील आता माहीत असलेल्या गोष्टी अधिक चांगली प्रकारे पाहता येतील आणि माहीत नसलेल्या गोष्टी सहज शोधता येतील,’ असे प्रो. गुप्ता यांनी सांगितले.
या दुर्बिणीचे फायदे काय?
या दुर्बिणीमुळे विश्वाची अधिक चांगल्या प्रकारे कल्पना येणार आहे व त्याचे अनेक उपयोग होणार आहे. मात्र, स्का प्रकल्प उभारताना काही वैज्ञानिक उद्दिष्ट ठरवण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दोन उद्दिष्ट अशी –
१. विश्वाची निर्मिती झाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे तारे नुकतेच तयार झालेले असतानाच्या काळावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळातील अनेक खगोलीय गुपिते उलगडतील.
२. भौतिकशास्त्रातील अनेक सिद्धांतांची शहानिशा करण्यासाठी या दुर्बिणीद्वारे घेतलेल्या निरीक्षणांचा उपयोग केला जाईल.
या दुर्बिणीद्वारे खूप मोठय़ा प्रमाणात खगोलीय निरीक्षणे उपलब्ध होतील. त्यांचे पृथ:करण करणे आणि त्यांचा उपयोग करून घेणे हे खगोलशास्त्रज्ञांपुढील एक आव्हान असेल.

Story img Loader