पिंपरी पालिकेच्या हद्दीलगत असणारी २० गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयास चहुबाजूने विरोध सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास हवा असेल, तर समाविष्ट व्हा, असे आवाहन केले असले तरी आधीच्या गावांच्या दुरवस्थेचे दाखले देत भाजप-सेनेबरोबरच राष्ट्रवादीचे नेतेही विरोधात उतरले आहेत. त्यामुळे समाविष्ट होण्याच्या मुद्दय़ावरून आगामी निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना चांगलीच डोकेदुखी होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे आहेत.
देहू, आळंदी, चाकण, हिंजवडी, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे पालिकेत आणण्यासाठी शासनाने पालिकेचा अभिप्राय मागवला आहे. तथापि, या निर्णयास सर्वत्र विरोध असल्याचे चित्र पुढे आले आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, भाजपचे आमदार बाळा भेगडे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते, हिंजवडीचे सरपंच सागर साखरे आदींनी उघडपणे विरोधाचा सूर लावला आहे. जिल्हा परिषदेने विरोध केला आहे. देहू-आळंदीतही पिंपरी पालिकेत जाण्यास विरोध व्यक्त झाला आहे. देहूत ग्रामसभेत विरोधाचा ठराव मांडण्यात येणार आहे. हिंजवडीची स्वतंत्र नगरपालिकेची मागणी आहे. या संदर्भात सरपंच सागर साखरे म्हणाले, माण, मारूंजी, नेरे, कासारसाई, जांबे व हिंजवडी अशी मिळून स्वतंत्र क दर्जाची नगरपालिका करावी. यापूर्वी समाविष्ट गावांत सुधारणा झाल्या नाहीत. तेथे नव्या गावांचा काय विकास होणार, असा त्यांचा प्रश्न आहे.
पिंपरी पालिकेचे सर्वेसर्वा अजितदादा गावे घेण्यासाठी आग्रही आहेत. विकास हवा असेल तर पालिकेत या, अशी भूमिका मांडून ताथवडे गावचा सुरुवातीला विरोध होता. नंतर ग्रामस्थांनी पालिकेत येण्याची भूमिका स्वीकारली, याचा दाखला त्यांनी दिला. नव्या २० गावांमध्ये असलेली तीव्र विरोधाची भावना पाहता तेथे कितपत यश मिळेल, याविषयी साशंकता आहे. विरोधकांच्या सुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सूर लावल्याने अडचण होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शासनाने हा विषय चर्चेला आणल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटणार असून गावांच्या समावेशावरून राजकारण होणार आहे.