पुणे मेट्रोला मंजुरी दिल्यानंतर आता मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून तसा आदेशही राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे. पुणे महानगर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन या नावाने ही कंपनी स्थापन होईल आणि मेट्रो उभारणीसह संपूर्ण मेट्रो प्रकल्प या कंपनीमार्फत चालवला जाईल. दरम्यान, मेट्रोचा सुधारित आराखडा दोन आठवडय़ांत सादर करण्याचे आदेशही गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत पुणे व पिंपरी महापालिकांना देण्यात आले.
देशातील ज्या महानगरांमधील मेट्रो प्रकल्पांचे काम रेंगाळले आहे त्याबाबतचा आढावा गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दिल्लीतील बैठकीत केंद्रीय नगरविकास खात्याचे सचिव सुधीर कृष्णा, राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त अभिषेक कृष्णा, पिंपरीचे आयुक्त श्रीकर परदेशी आणि देशात सुरू असलेल्या अहमदाबाद, पाटणा, गुहावटी, इंदूर या शहरांमधील मेट्रो प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा सुधारित आराखडा दोन आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. पुणे व पिंपरीत मेट्रोची स्टेशन जेथे प्रस्तावित करण्यात आली आहेत, तेथे पीएमपीच्या गाडय़ा, तसेच रिक्षा आणि नागरिक कशा पद्धतीने पोहोचू शकतील, याचा आराखडा सादर करण्याबाबत सांगण्यात आले असून अपंग नागरिकांची सोय तसेच मेट्रो स्टेशनजवळ पार्किंगची सोय काय असेल, याचाही आराखडा तयार करायचा आहे. त्यानुसार दोन आठवडय़ांत हा आराखडा केंद्राला सादर केला जाईल.
कंपनी स्थापण्याचीही प्रक्रिया मार्गी
पुणे मेट्रोला राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला असून मंजुरीची पुढील प्रक्रिया दिल्लीत सुरू झाली आहे. पुणे मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी एसपीव्ही स्थापन केली जाणार असून कंपनी स्थापन करण्यासंबंधीचा अध्यादेश राज्य शासनाने तसा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळात राज्य शासनाचे पाच प्रतिनिधी असतील. त्यात पुणे व पिंपरीचे आयुक्त तसेच प्रधान सचिव आणि नगरविकास विभागाचे दोन सचिव असतील. तसेच केंद्राचेही काही प्रतिनिधी संचालक म्हणून कंपनीवर असतील.
पुणे मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची कार्यवाही सुरू
पुणे मेट्रोला मंजुरी दिल्यानंतर आता मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून तसा आदेशही राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे.
First published on: 08-11-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New company found for pune metro