सांगवीतील ‘निळू फुले रंगमंदिर’ मार्चअखेरीस सुरू होणार
वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची ‘सांस्कृतिकनगरी’ म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या शहरातील नाटय़प्रेमी रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘२०१७’ची नववर्षांची भेट म्हणून शहरात आणखी एक सुसज्ज नाटय़गृह उपलब्ध होणार आहे. बराच काळ रखडलेले सांगवी-पिंपळे गुरव येथील ‘निळूभाऊ फुले नाटय़मंदिर’ असे नामकरण झालेले हे नाटय़गृह येत्या मार्चअखेरीस खुले करण्यात येणार आहे. शहरात सध्या तीन नाटय़गृहे आहेत, त्यात आणखी एका नाटय़गृहाची भर पडणार आहे.
‘काटे पूरम’ चौकात एक एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या नाटय़गृहाची ६१८ आसनक्षमता आहे. याशिवाय, छोटय़ा कार्यक्रमांसाठी २५० आसनक्षमतेचे स्वतंत्र सभागृह राहणार आहे. या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २४ एप्रिल २०१२ला या कामाचे आदेश देण्यात आले होते. मात्र, काही अडचणी निर्माण झाल्याने नाटय़गृहाचे काम सुरू होत नव्हते. मात्र, एकेक करत त्या अडचणी दूर झाल्यानंतर २०१५ मध्ये हे काम सुरू झाले. आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यासाठी १८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. मार्चअखेरीस नाटय़गृह सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. नाटय़गृहाच्या रचनेत विश्रांतिगृह, पाहुण्यांचा कक्ष, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा, कॅफेटेरिया आदींची व्यवस्था आहे. नाटय़गृहांचा अभ्यास असणाऱ्या मान्यवरांशी चर्चा करून काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. याशिवाय, १०४ चारचाकींसाठी तसेच २७५ दुचाकींसाठी असे सुसज्ज वाहनतळ सुरू करण्यात येणार आहे. रंगीत तालीम करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. नियोजन सल्लागार किरदास असून बांधकाम बी. जी. शिर्के कंपनीस देण्यात आले आहे. नाटय़गृहाला ‘निळूभाऊ फुले रंगमंदिर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या बाबतच्या ठरावास मान्यता देण्यात आली आहे. महापौर शकुंतला धराडे व राजेंद्र जगताप यांच्या प्रभागात हे नाटय़गृह होत असून, यासाठी स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठपुरावा केला आहे.
नाटय़गृहाला निळूभाऊ फुले यांचे नाव देण्यात आले असल्याने त्यांचे भव्य छायाचित्र दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. नाटय़गृहाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मार्चमध्ये समारंभपूर्वक उद्घाटन होईल. त्यानंतर तातडीने नाटय़गृह प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
– राजन पाटील, सहशहर अभियंता, पिंपरी महापालिका
काय घडणार ?
* अंतिम टप्प्यातील कामे लवकरच पूर्ण होणार
* नाटय़गृहाच्या दर्शनी भागात निळू फुले यांचे भव्य छायाचित्र
* उद्घाटनानंतर नाटय़गृह तातडीने खुले होणार