पिंपरी महापालिकेने विक्रमवीर जलतरणपटू अमोल आढाव याला आर्थिक मदत करण्याची घोषणा करून प्रत्यक्षात काहीच दिले नाही आणि नव्या विक्रमासाठी सहकार्य करण्याची मागणी केल्यानंतर मदतीऐवजी दिलगिरी व्यक्त केली. यापूर्वीही अनेकांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचे उघड झाल्याने स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले. आतापर्यंत किती जणांना मदत जाहीर केली व त्यापैकी किती जणांना प्रत्यक्षात दिली, याचा लेखाजोखा समितीने मागवला आहे.
अमोलने २२ तासात १६ वेळा सिंहगड चढून जाण्याचा विक्रम केला. तसेच, बंगालची ८१ किलोमीटरची खाडी ११ तासात पार केल्याबद्दल महापालिकेने त्यास एक लाख रूपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली, त्यानुसार, ठरावही मंजूर केला. प्रत्यक्षात त्यास साडेतीन वर्षांनंतरही ही रक्कम मिळालेली नाही. त्यानंतर, अमोलने स्पेन ते मोरोक्को खाडी पार करण्यासाठी ४ फेब्रुवारी २०१३ ला पालिकेकडे आर्थिक मदतीची मागणी केली. तथापि, ही रक्कम देऊ शकत नसल्याचे पत्र देऊन पालिकेने त्याच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. वैयक्तिक विक्रम प्रस्थापित करण्यासाठी आपण मदत मागितली असून तशी आर्थिक मदत देता येणार नसल्याचे स्पष्ट करणाऱ्या पत्रात अमोलच्या पुढील कारकिर्दीला ‘शुभेच्छा’ही देण्यात आल्या. या दोन्ही घटनांसंदर्भात सभापती महेश लांडगे यांनी स्थायी बैठकीत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जर उभरत्या खेळाडूंना, विक्रमवीरांना मदत करता येत नसेल तर क्रीडा विभाग बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. खाडय़ा पार केल्याप्रकारणी दोन खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच तोडीचा आढाव असताना त्याची हेटाळणी करण्यात आली, हे संतापजनक आहे. येत्या आठ दिवसात अशा खेळाडूंचे पैसे दिले पाहिजेत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार, पुढील बैठकीत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Story img Loader