पिंपरी-चिंचवड शहरातील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नऊ महिन्यांपूर्वी संबंधितांना दिले. मात्र, त्या आदेशाला सर्वानी मिळून केराची टोपली दाखवली असून यात पालिकेचे अधिकारीही मागे नाहीत. पालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी देऊनही त्याकडे सरळसरळ कानाडोळा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
बिहारमधील बोधगया येथे महाबोधी मंदिर व आसपासच्या परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा सीसीटीव्हीचा विषय ऐरणीवर आला आहे. पुण्यात जर्मन बेकरीत झालेला बॉम्बस्फोट व जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटासारख्या घटनांमुळे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या हेतूने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्याचा आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला होता. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा संदर्भ त्यांनी दिला होता. त्यानुसार, १० ऑक्टोबर २०१२ ला पालिका हद्दीतील मॉल्स, दुकाने, कंपन्या, विविध कार्यालये, सभागृहे, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे, दवाखाने आदींचे मालक व भोगवटादार यांनी एक महिन्याच्या आत त्यांच्या इमारतींच्या सर्व प्रवेशद्वारावर, अंतर्गत भागात, वाहनतळाच्या जागेवर कॅमेरे बसवावेत व त्यात एक महिन्याची रेकॉर्डिगची सुविधा असावी, असे बजावण्यात आले होते. याशिवाय, सभा, गणेशोत्सव आदी कार्यक्रमांसाठी संयोजकांनी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. तथापि, नऊ महिन्यांनंतरही फारसा फरक पडला नसून या आदेशास सर्वानी मिळून केराची टोपली दाखवली आहे.
आयुक्तांनी १० जानेवारी २००३ ला घेतलेल्या एका बैठकीत विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. तेव्हा सर्वानी मिळून खबरदारी घेण्याचे व आवश्यक तेथे सीसीटीव्ही लावण्याचे ठरवले होते. त्यानुसार प्रभाग स्तरावर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सातत्याने विचारणा केली. पाच वेळा स्मरणपत्रे दिली. तरीही प्रभाग कार्यालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते. सद्य:स्थितीत भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१, चिंचवड २१४, पिंपरी ८९४, निगडी २७४, सांगवी ४७२ तर एमआयडीसी हद्दीत ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची नोंद पालिकेकडे आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांनी आपल्या पद्धतीने पुढाकार घेतला होता, असे सांगण्यात येते. पालिकेने मात्र वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्याविषयी नागरिकांमध्ये गांभीर्य नाही. कॅमेरे बसवणे खर्चिक असून त्याची निगा राखणे अवघड आहे, असाच सूर सर्वत्र आळवला जातो आहे.