पोलीस चौकी अथवा ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिले आहेत. मात्र, तक्रार घेऊन गेल्यानंतर चौकीत पोलीस नसल्यामुळे अनेक तास ताटकळत बसावे लागत असल्याचा अनुभव सध्या पिंपळे सौदागर पोलीस चौकीत जाणाऱ्या नागरिकांना घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर दीड ते दोन तासानंतर एखादा पोलीस आलाच, तर साहेब नसल्याचे कारण देत पुन्हा ताटकळत थांबावे लागते.. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने तक्रार द्यायची कुठे, असा सवाल नागरिक करत आहेत.
पोलीस ठाण्यात अथवा चौकीत गेल्यानंतर विविध कारणे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी त्याची दखल घेत चौकीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार नोंदवून घ्यावी, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तक्रार घेण्यास टाळाटाळ करताना आढळून आलेल्या काही कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली होती. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून घेतलय़ा जातील, अशा अपेक्षा होत्या. मात्र, सध्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर चौकीत गेल्यानंतर बऱ्याच वेळा पोलीस नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्याबाबत काही नागरिकांनी दैनिक ‘लोकसत्ता’ ला फोन करून याची माहिती दिली.
याबाबत एका महिलेने सांगितले की, त्या पिंपळे सौदागर चौकीत तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांना सुमारे तासभर थांबावे लागले. त्या वेळी तिथे इतरही तक्रारदार होते. चौकीत कोणीच पोलीस कर्मचारी नव्हते. या पोलीस चौकीमध्ये दूरध्वनीची व्यवस्था नाही. चौकीच्या बाहेर दूरध्वनी क्रमांकाची यादी लावण्यात आली आहे. मात्र, त्यावर फोन केल्यानंतर तो सांगवी पोलीस ठाण्यात जातो. त्यांच्याकडे तक्रार देण्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून पिंपळे सौदागर चौकीत जाण्यास सांगितले जाते. या ठिकाणी नागरिकांना तासन् तास ताटकळत थांबावे लागते. काही तास थांबल्यानंतर एखादा पोलीस चौकीत येतो. तोसुद्धा लगेच तक्रार घेत नाही. चौकशी केल्यावर, साहेब येणार आहेत, त्यानंतर तक्रार नोंदविली जाईल, असे सांगून थांबविले जाते. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Story img Loader