अहो दादा, सगळ्यांना द्यायला चिल्लर आणायची कुठून, बघा असतील तर द्या पाच सुटे.. हा नेहमीचा संवाद पीएमपीच्या गाडय़ांमध्ये आता ऐकायला मिळणार नाही. पीएमपीने तिकिटांच्या दरांची पुनर्रचना केली असून पाच रुपये व त्या पटीत असलेले नवे दर बुधवारपासून लागू होत आहेत. त्यामुळे सुटय़ा पैशांवरून होणारे वाद, भांडणे आणि प्रसंगी हमरीतुमरी असे प्रसंग पीएमपीच्या गाडय़ांधून बुधवार (२८ ऑगस्ट) पासून हद्दपार होतील अशी आशा आहे.
सुटय़ा पैशांवरून प्रवासी व वाहक (कंडक्टर) यांच्यात सातत्याने होणारे वाद बंद करण्याच्या दृष्टीने तिकीटांचे दर पाच रुपये व त्या पटीत ठेवण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने २ ऑगस्ट रोजी एकमताने घेतला होता. या निर्णयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सोमवारी मान्यता दिली. त्यानुसार नवे दर बुधवारपासून अमलात येत आहेत. या निर्णयानुसार आता पीएमपीचा किमान तिकीट दर पाच रुपये, तर कमाल दर ३५ रुपये राहील. नव्या धोरणानुसार तिकिटांच्या दरांची पुनर्रचना करताना जवळच्या पाच रुपयांच्या टप्प्यानुसार तिकीटदर आकारला जाईल. त्यानुसार नऊ रुपयांचे तिकीट १० रुपयांना, तसेच ११ व १२ रुपयांचे तिकीटही १० रुपयांना मिळेल.
प्रवाशांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या तक्रारी तसेच तिकिटे व पैसे देताना येणाऱ्या सुटय़ा पैशांच्या अडचणी लक्षात घेऊन तिकीटदरात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या निर्णयामुळे पीएमपीला रोज किमान दोन ते अडीच लाख रुपयांचा तोटा येईल, अशी शक्यता आहे. मात्र, सुटय़ा पैशांवरून होणारे वाद या निर्णयामुळे टळतील व प्रवासीसंख्या वाढेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ज्या तिकिटांचे दर कमी होणार आहेत, त्याचा फायदा रोज सुमारे साडेसहालाख प्रवाशांना होईल, असा अंदाज आहे.
कृपया चौकट करता येईल
पीएमपी: जुने व नवे दर
किमान तिकीट ५ रुपये
जुना तिकीट दर ९, १०, १२ नवा दर १०
जुना दर १४, १५, १७ नवा दर १५
जुना दर १८, २०, २२ नवा दर २०
जुना दर २२, २४, २६ नवा दर २५
जुना दर २८, २९, ३०, ३१, ३२, नवा दर ३०
जुना दर ३४ नवा दर ३५
दादा, चिल्लर आणायची कुठून.. पीएमपीतून हा संवाद आता हद्दपार!
पीएमपीने तिकिटांच्या दरांची पुनर्रचना केली असून पाच रुपये व त्या पटीत असलेले नवे दर बुधवारपासून लागू होत आहेत.
First published on: 27-08-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No problem for change in pmp fare