पालिकेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात अजित पवार यांचा दावा

महाराष्ट्रात सध्या मराठा, मुस्लीम, धनगर आदी सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता आहे, त्याची दखल घेत राज्यकर्त्यांनी तातडीने निर्णय घ्यायला हवेत, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे बोलताना केले. पिंपरी महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात माझा संबंध नाही. तसे एक जरी उदाहरण दिले तरी शहरात यापुढे पाऊल ठेवणार नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

पिंपरी पालिकेच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार अजितदादांच्या हस्ते झाला. प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, खेलरत्न अंजली भागवत आदी उपस्थित होते.

विरोधकांनी केवळ आरोप करू नयेत. त्यांचे सरकार आहे, जरूर चौकशी करावी. नगरविकास खाते त्यांच्याकडेच आहे, असे सांगून पवार म्हणाले, राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-सेनेत तीव्र वाद आहेत. दोघेही सत्तेला चिकटून बसलेले आहेत. राज्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता नसल्यास प्रशासनावर तसेच विकासकामावर परिणाम होतो. मुंबई महापालिकेच्या २२७ जागा आहेत. त्याचे वाटप होताना शिवसेना भाजपला जास्त जागा देणार नाही आणि भाजप ते मान्य करणार नाही. पूर्वी बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांमुळे समन्वय होता. आता त्या ताकदीचे नेते दोन्हीकडे नाहीत. युती कोण तोडतंय, एवढाच मुद्दा राहिला आहे. पिंपरी-चिंचवड हे देशातील एकमेव नियोजनबद्ध शहर आहे, असे उद्गार प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडले पाहिजेत. सर्वाच्या योगदानातून शहराचा नावलौकिक वाढला आहे.

प्रास्ताविक आयुक्त वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी आभार मानले.