भाडे टाळण्यासाठी रिक्षाचालकांप्रमाणे प्रवाशांना वागणूक
सहल परवान्यावर चालणाऱ्या, पण शहरांतर्गत वाहतुकीत शिरकाव करून अल्पावधीतच अनेकांची पसंती मिळालेल्या ओला, उबेर या मोबाइल अॅपवर आधारलेल्या कॅब सुविधेबाबत आता तक्रारींचा पाढा सुरू झाला आहे. या कॅब चालकांकडूनही भाडे नाकारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रिक्षा चालकांच्याच ‘मार्गावर’ हा प्रवास सुरू झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी कॅब सुविधा स्वीकारल्यानंतर आता मात्र विविध प्रकाराने बनवाबनवीचे प्रकार सुरू झाले असल्याचे प्रवाशांच्या तक्रारींवरून स्पष्ट होत आहे.
पुणे शहरामध्ये जवळपास पन्नास हजारांच्या आसपास रिक्षांची संख्या आहे. शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर रिक्षा असतानाही ओला, उबेर कंपन्यांच्या शहरांतर्गत कॅब सुविधेने मागील दोन वर्षांमध्ये शहरात चांगलाच जम बसविला. तांत्रिक बाब पाहिल्यास या कॅब सेवेला सहल परवाना आहे. शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी टप्पा वाहतुकीची परवानगी आवश्यक असते. याच मुद्दय़ावर शहरातील रिक्षा संघटनांनी या कॅबला कडाडून विरोध केला. त्याविरोधात आंदोलनेही करण्यात आली. मात्र, मोबाइल अॅपवर शहरात कोणत्याही ठिकाणी काही वेळातच प्रवासाची सुविधा उपलब्ध होत असल्याने आणि सुरुवातीच्या काळात चोखपणे सेवा दिल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर नागरिक या सुविधेकडे आकर्षित झाले. मात्र, हळूहळू या सुविधेनेही रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे.
रिक्षा चालकांचे शहरात खासगी थांबे आहेत. या थांब्यांच्या आसपास असलेले भाडेच अनेकदा स्वीकारले जाते. दुसऱ्या ठिकाणच्या खासगी थांब्यावर रिक्षा थांबू दिली जाणार नसल्यास तेथील भाडे घेतले जात नाही. त्यातून रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याच धर्तीवर आता ओला, उबेरच्या चालकांचेही शहरात विभागवार गट निर्माण झाले आहेत. भाडे घेण्याच्या जागाही ठरविण्यात आल्या आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या पाच ते सहा किमी. अंतराचे भाडे घेतले जाते. त्यामुळे चालकांनी ठरवून घेतलेल्या परिघाबाहेरील भाडे आल्यास ते विविध कारणे देत नाकारले जाते. जायचे ठिकाण लांब आहे वा प्रवासी घेण्याचे ठिकाण कॅबपासून दूर असल्याची कारणे दिली जात असल्याच्या तक्रारी प्रवाशी करीत आहेत.
एकाच वर्षांत साडेबारा हजार कॅबची वाढ; कॅबची संख्या पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक
मोबाइल अॅपवर चालणाऱ्या कॅब सुविधेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे या कॅबची संख्या मागील काही दिवसांमध्ये झपाटय़ाने वाढली आहे. पुणे शहरात २०१६-१७ पूर्वी दहा हजारांच्या आसपास कॅब धावत होत्या. मात्र, २०१६-१७ या एकाच वर्षांमध्ये शहरात साहेबारा हजारांहून अधिक कॅब दाखल झाल्या. सध्या पुण्यात २२ हजार ४२३ कॅब आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेल्या कॅबपेक्षा पिंपरी- चिंचवडमध्ये नोंद झालेल्या कॅबची संख्या जास्त आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये २४ हजार ४२३ कॅब आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज, सोलापूर या परिवहन विभागाच्या पुणे विभागात कॅबची संख्या सुमारे पन्नास हजार इतकी आहे.
अनेकदा गर्दीच्या वेळात कॅबचे चालक फोन करतात आणि कुठे जायचे आहे ते ठिकाण विचारतात. ठिकाण लांबचे असेल तर चालकाकडून ट्रिप रद्द केली जाते. अनेकदा असा अनुभव आला आहे. ज्या ठिकाणी कॅब असते तेथून ‘पिक अप लोकेशन’ लांब असल्याचे कारण देऊनही चालक ट्रिप रद्द करत असल्याचा अनुभव आहे. ट्रिप रद्द झाल्यानंतर पुन्हा नवी कॅब शोधावी लागते. दरम्यानच्या काळात मागणी वाढल्यामुळे प्रवासाचे भाडेही वाढलेले असते. त्या वाढीव भाडय़ाचा भुर्दंड प्रवाशांना बसतो.
– अदिती कुलकर्णी, प्रवासी