खोडद येथे उभारलेल्या ‘जीएमआरटी’ या जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे काम सध्या सुरू आहे. या सुधारणांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचे उद्घाटन १५ सप्टेंबरला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स’चे (एनसीआरए) केंद्र संचालक एस. के. घोष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोविंद स्वरूप या वेळी उपस्थित राहणार आहेत.
प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याविषयी माहिती दिली. ‘टाटा इन्स्टिटय़ूट फॉर फंडामेंटल रीसर्च’तर्फे जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) ही दुर्बीण सुमारे १७ वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या क्षेत्रांतील अभ्यासासाठी तिचा उपयोग केला जातो. उभारणीच्या वेळी दुर्बिणीत वापरण्यात आलेल्या तांत्रिक प्रणालीला आजच्या काळात मर्यादा येत असून त्यात सुधारणा केल्या जात आहेत. या सुधारणांसाठी एनसीआरए, एनव्हिडिया कंपनी, कॅस्पर कंपनी आणि ऑस्ट्रेलियातील स्वीनबर्न विद्यापीठाचे सहकार्य घेतले जात आहे.
दुर्बिणीच्या एकूण ३० अँटेनांपैकी १२ ते १५ अँटेनांमध्ये सुधारित प्रणाली बसवून झाली असून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. सर्व सुधारणा कार्यान्वित झाल्यानंतर दुर्बिणीद्वारे अधिक माहिती घेता येणार असून ती माहिती विनाविलंब आणि विस्कळित न होता मिळू शकणार आहे.

Story img Loader