महिलांचे बचत गट ही चांगली चळवळ आहे. मात्र, काही ठिकाणी बचत गटांनी अनुदानाचे पैसे घेतले आणि गट बंद केल्याचे प्रकार घडले. त्यामुळे ही चळवळ बदनाम होऊ लागली. परिणामी, बचत गट तीन वर्षे कार्यरत राहिल्यानंतर अनुदान देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला, असे महापौर मोहिनी लांडे यांनी सांगवीत बोलताना स्पष्ट केले.
सांगवीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानात सुरू झालेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, महिला व बालकल्याणच्या सभापती शुभांगी लोंढे, नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, रामदास बोकड आदी उपस्थित होते. महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल किवळ्यातील शुभांगी वानखेडे यांना महापौरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरवण्यात आले.
महापौर म्हणाल्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनुदान दिले जाते. मात्र, ते वाटून घेतले जाते. वास्तविक त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. अनुदानातून लघुउद्योग उभे राहिले पाहिजेत. भीमथडीत पिंपरी-चिंचवडच्या बचत गटांना सहभागी होता येत नव्हते, त्यामुळे पवनाथडी सुरू करण्यात आली. पालिका बचत गटांकडून शुल्क आकारत नाही. त्यामुळे महिलांनाही चांगले व्यासपीठ मिळाले. नागरिकांनी या उपक्रमास पािठबा देण्यासाठी पवनाथडीला भेट द्यावी, असे आवाहन महापौरांनी केले. सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका शैलजा शितोळे यांनी आभार मानले.

Story img Loader